Pune News | उत्सवाचा जल्लोष की ध्वनी प्रदूषण? ; ध्वनी प्रदूषणाचा अहवाल प्रसिद्ध

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुण्यातील सुमारे २०० मंडपांमध्ये केलेल्या ध्वनी निरीक्षणातून संमिश्र चित्र समोर आले आहे. काही भागांत ध्वनी प्रदूषणात स्वागतार्ह घट झाली असली, तरी काही ठिकाणी पातळी वाढल्याचेही स्पष्ट झाले. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या नोंदीत, शिवाजीनगरमधील तात्याबा साधूजी गायकवाड रस्त्यावर २७ ऑगस्टला ध्वनी पातळी ७४.५ डेसिबलवरून २८ ऑगस्टला ७१.१ डेसिबलपर्यंत खाली आली.
मात्र, जंगली महाराज रस्त्यावरील उत्कर्ष मित्र मंडळाने ८७.७ डेसिबल्स, तर सहकारनगरमधील अखिल यशवंतराव चव्हाण नगर मित्र मंडळाने १ सप्टेंबरला तब्बल ९३.४ डेसिबल्सची नोंद केली. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला मुख्य विसर्जन दिवशी, ध्वनी पातळी ९९.८ डेसिबल्सला उच्चांकावर पोहोचली होती. त्याच्या तुलनेत यंदाचे निरीक्षण काही प्रमाणात सकारात्मक मानले जात आहे.
प्रमुख चौकांतील आकडेवारी..
लक्षणीय घट : औंध-वाकड रस्त्यावरील ऋषी चौकात दिवसाच्या वेळेत ध्वनी पातळीत ११ डेसिबल्सहून अधिक घट झाली. जुना बाजार चौकात रात्रीच्या पातळीत ६ डेसिबल्सहून अधिक घट झाली.
चिंतेची ठिकाणे : रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात दिवसाच्या ध्वनी पातळीत ११ डेसिबल्सपेक्षा जास्त वाढ झाली. लक्ष्मी नगर चौकात २.५८ डेसिबल्स आणि संत कबीर चौकात ५.६९ डेसिबल्स इतकी वाढ नोंदली गेली.





