प्रभात वृत्तसेवा पुणे – रत्नजडीत रथाला पुष्पांची आकर्षक सजावट, त्यावर कोल्ड फायरची आतषबाजी, भंडाऱ्याची उधळण, पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांचा गजर, मोरया मोरयाचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.सकाळी साडेसात वाजता पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते बाप्पाची पूजा आणि आरती झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता श्री गणेशरत्न रथ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. तेथे परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.रात्री १० वाजून ११ मिनिटांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा असलेला रंगारी रथ बेलबाग चौकात दाखल झाला. या रथावर पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. त्यामध्ये वृक्ष पुनर्रोपणाविषयी जनजागृती करणारा डिजीटल बोर्ड लावण्यात आला होता. त्यानंतर रमणबाग आणि श्रीराम ढोलपथकाने चौकात वादन केले.रात्री ११ वाजता बाप्पा विराजमान झालेला श्री गणेशरत्न रथ बेलबागचौकात आला. येथे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आणि बालन यांच्याहस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर रथ लक्ष्मी रस्त्यावर मार्गस्थ झाला, याचे सारथ्य स्वत: पुनीत बालन यांनी केले. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी केली जात होती, तर रथावर कोल्ड फायरची होणारी आतषबाजी यामुळे रथ अधिकच आकर्षक दिसत होता.पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास श्री गणेशरत्न रथ टिळक चौकात आल्यानंतर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि रथ विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर महापालिकेच्या कृत्रिम हौदात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. श्री गणेश रत्नरथाची आकर्षक सजावट… श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक १३४ वर्षांपासून पारंपरिक रथात केली जात होती. मात्र, गतवर्षी पासून विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी आकर्षक रथ तयार केला जातो. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रस्टने श्री गणेशरत्न रथ तयार केला होता. रत्नजडीत रथावर पिंक वेलवेट फुलांची करण्यात आलेली सजावट, विद्युत रोषणाई आणि त्यावरील रंगारी बाप्पाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे हा रथही भाविकांचे लक्ष वेधून घेत होता, हजारो भाविकांनी त्याची छबी आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेतली. “पोलीस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. आमच्या मंडळासाठी जो मिरवणुकीचा कालावधी निश्चित केला होता, त्यापेक्षा कमी कालावधीत विसर्जन मिरवणूक संपवून आम्ही पोलिसांना दिलेला शब्द पाळला. मात्र, आम्हाला दिलेल्या वेळेनुसार मिरवणुकीत सहभागी होता आले असते तर बाप्पाच्या दर्शनासाठी येऊन थांबलेल्या हजारो भाविकांना प्रतीक्षा करावी लागली नसती. मात्र, हा संपूर्ण गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!” – पुनीत बालन, विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट