Pune News | १२ घाट, ३० अधिकारी, ३० जवान ; अग्निशमनदलाचा दहा दिवस खडा पहारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दरवर्षी प्रमाणे यंदाही अग्निशमन दलाने दहा दिवस कार्यरत राहून विसर्जनावेळी नदीपात्रात व घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. त्यातच, शेवटचे दोन दिवस नदीपात्रात मुठा नदीतून विसर्ग सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला होता. या स्थितीत विसर्जनासाठी आलेल्या मोठ्या गणेशमूर्तीं विसर्जनासही अग्निशमनदलाकडून मंडळांना मदत करण्यात आली.
पहिल्या दिवसापासून विसर्जन संपेपर्यंत एकूण १२ विसर्जन घाटांवर पालिकेतर्फे नेमण्यात आलेले १२० जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाचे ३० अधिकारी व ३० जवान बंदोबस्तावर तैनात होते. विसर्जनाच्या दोन दिवस मिरवणूक मार्गानजीक अलका चौक, अभिनव चौक व फरासखाना चौक येथे अग्निशमन वाहनेही सज्ज ठेवण्यात आली होती.
दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहाव्या दिवशी विसर्जनावेळी कुठेही बुडाल्याची घटना घडली नाही. अलका चौकात किरकोळ आगीची घटना घडली, मात्र ती तत्काळ नियंत्रणात आणण्यात आली. या कालावधीत अग्निशमन दलातील सर्व अधिकारी व जवान यांच्या रजा व सुट्ट्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यांच्या दक्षतेमुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि सुरक्षिततेने पार पडला.
“अग्निशमन दलाकडून विविध घाटांवर अधिकारी व जवान यांनी उत्तम कार्य केल्याने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. अग्निशमन दल नेहमीच सतर्क राहून आपले कर्तव्य बजावत असते.”
– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी





