Administrative Division : मोठी बातमी! ‘या’ चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार; बावनकुळे यांची घोषणा
Administrative Division : महाराष्ट्रात चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार आहे. बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालये सुरू होणार असून 21 जिल्ह्यांत 47 नवीन अप्पर तहसील कार्यालये होणार आहेत.

Administrative Division : राज्यातील नागरिकांना प्रशासकीय कामे अधिक सोप्या पद्धतीने करता यावीत, यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.
याशिवाय राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 47 नवीन अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना महसूल आणि इतर प्रशासकीय कामांसाठी जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होण्याची शक्यता आहे. प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ नेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून पंढरपूरसह सात तालुक्यांचा प्रशासकीय कारभार हाताळला जाणार आहे. यामध्ये पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, करमाळा आणि मोहोळ या तालुक्यांचा समावेश आहे.
सध्या पंढरपूर परिसरातील नागरिकांना अनेक प्रशासकीय कामांसाठी सोलापूर जिल्हा मुख्यालयात जावे लागते. नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे या भागातील नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित जिल्ह्यांमधील प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने आणि स्थानिक पातळीवर होण्यास मदत होऊ शकते.





