Gandhi Jayanti: गांधी जयंतीनिमित्त आकुर्डीत स्वच्छता श्रमदान! म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पिटल परिसर चकाचक
Gandhi Jayanti: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि बेसिक्स संस्थेच्या वतीने आकुर्डीत सखोल स्वच्छता मोहीम.

Gandhi Jayanti- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बेसिक्स संस्थेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पिटल परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी, लाईट हाऊसचे ५० सदस्य, महानगरपालिकेची आयईसी टीम आणि सफाई मित्रांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने शुक्रवार (दि. २) रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेदरम्यान रस्त्यालगतचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे, मंदिर परिसर तसेच कचरा साचलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. साचलेला कचरा, पालापाचोळा आणि अनावश्यक वस्तू हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. महानगरपालिकेचे उपआयुक्त प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे,
सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे आणि मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश हिंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि परिसराची नियमित स्वच्छता राखणे याबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मोहिमेत आरोग्य निरीक्षक विकास शिंदे, राजू चटोले, आरोग्य मुकादम दीपक केदारी, ओमप्रकाश सौदा, अशोक चावरिया, पठाण बोटे, संतोष धोत्रे, लाईट हाऊसचे झोनल रिचार्ज दिलखुश कारपेंटर, प्रभाग समन्वयक अजित महाडिक, श्रीराम डुकरे, आयईसी टीम तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांतून प्रेरणा घेत स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर घडविण्यासाठी नागरिकांनीही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





