Ganesh Jambhulkar : हिंजवडीच्या सरपंचाने दिले स्पष्टीकरण; अजितदादांनी सुनावणे होते खडेबोल, नेमकं काय घडलं होतं? म्हणाले “माझं म्हणणं…”

Ganesh Jambhulkar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडीमधील राजीव गांधी आयटी पार्क परिसराचा दौरा केला होता. यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडेबोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर आता हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खडेबोल वैगरे नाही, दादा पाहणी दरम्यान ज्या अडचणी समोर येत होत्या. पीएमआरडी, एमआयडीसी, PWD अंतर्गत सगळे रस्त्यात येतात, ह्यात चुकी सगळी त्यांची, त्या चुकीसंदर्भात दादांना बोलायला गेलो होतो, असे ते म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी हिंजवडीतील कामांची पाहणी करताना अतिक्रमणाविषयी भाष्य करताना जो कोणी आडवा येईल त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असे थेट संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. गेल्या ५० वर्षांपासून लोक राहतात ते अचानक कसे काढणार अनेक अतिक्रमण आहेत ते सांगायला मी गेलो होतो पण दादांनी ऐकून घेतलं नाही, असा आरोप जांभुळकर यांनी केला आहे.
दादांनी समस्या कुणामुळे झाल्या हे जाणून घेतल पाहिजे. त्यांचा खोलापर्यंत गेलं पाहिजे त्या ग्रामपंचायतीची काय चूक आहे, असा सवाल जांभुळकर यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही दादाना सांगतो आहे. आम्हाला वेळ द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागच्या बैठकीला आम्ही बळजबरीने आत गेलो, मात्र आम्हाला बाहेर काढून दिलं, असा आरोपही त्यांनी केला आहे.
नेमकं अजित पवार काय म्हणाले होते?
गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या बाबतीत तंबी दिली होती. यावेळीच हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावले होते.
अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो…आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय…माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर….बेंगलोरला हैदराबादला …काय तुम्हाला पडलं नाही….असं अजित पवार म्हणाले होते.





