इराणवर अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे हल्ला करून जे युद्ध छेडले आहे ते युद्ध खामेनी यांच्या हत्येनंतर आटोक्यात येईल असे वाटले होते, पण त्याची व्याप्ती आता आणखीनच वाढली असून हा संघर्ष बेलगाम पातळीवर गेला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनी यांच्याबरोबरच त्या देशाची जवळपास सगळी महत्त्वाची लीडरशिप गारद झाली. अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारीही मारले गेले. हा तडाखा अतिप्रचंड स्वरूपाचा होता, त्यातून इराण सावरण्याची शक्यता नाही, असे वाटत असतानाच इराणने आपली उरलीसुरली शक्ती वापरात आणून अंदाधुंद प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. आखातातल्या जवळपास आठ देशांवर इराणने क्षेपणास्त्राद्वारे मारा केला. इस्रायलवरही नव्याने हल्ला करताना थेट नेतान्याहू यांच्या कार्यालयालाही इराणने लक्ष केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची काही लढाऊ विमानेही इराणने पाडली, तसेच युरोपीय देशांच्याही काही लष्करी ठिकाणांवर इराणने हल्ले केल्याने या युद्धाची व्याप्ती आज अचानक वाढल्याचे लक्षात येते. ही परिस्थिती लक्षात घेऊन आखातात ब्रिटनचे जे काही लष्करी तळ आहेत त्या तळांचा वापर करण्याची अनुमती अमेरिकेने ब्रिटनकडे मागितली आणि ब्रिटननेही अमेरिकेला तातडीने ती अनुमती दिली आहे. ब्रिटन बरोबरच फ्रान्स, जर्मनी आणि अन्य काही युरोपीय देशांनी अमेरिकेचे समर्थन करून त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हा मामला आता आणखीन गंभीर बनला असून आता एकाकी पडलेल्या इराणच्या बाजूनेही रशिया आणि चीन सारखे देश उतरतील काय अशी नवी शंका निर्माण झाली आहे. हे सगळे होत असतानाच हेजबुल्ला संघटनेनेही इराणच्या समर्थनार्थ इस्रायलवर हल्ले सुरू केले, त्यांना काबुत आणण्यासाठी इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले, तेथे मोठी जीवितहानी झाली. या सगळ्या घडामोडी उर्वरित जगाची झोप उडवणार्या आहेत. इराणकडून जसे प्रत्युत्तराचे हल्ले सुरू झाले तसा अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर नव्याने मारा सुरू झाला आहे. इराणवर अंदाधुंद बॉम्बफेक सुरू असून त्या देशात मृत नागरिकांचे अक्षरशः ढीग रचले गेल्याचे एका वृत्तांत म्हटले आहे. इराणमधील मृतांच्या नेमक्या संख्येचा अंदाज अजून लागू शकलेला नसला तरीही एका आंतरराष्ट्रीय संस्थेने इराणमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसातच किमान 555 नागरिक ठार झाल्याची प्राथमिक माहिती दिली. पहिल्याच हल्ल्यात खामेनी आणि इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांचा खात्मा केल्यानंतर हे युद्ध आटोक्यात येईल किंबहुना इराण भयभीत होऊन, दिशाहीन होईल असे जे वाटले होते तसे अजिबात झालेले दिसत नाही. इराणकडे अमेरिका आणि इस्रायलच्या तुलनेमध्ये अत्यंत मर्यादित लष्करी शक्ती आहे. त्यातच अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या हवाईदलाचे कंबरडे साफ मोडले आहे, इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण ठिकाणांवरही व्यापक स्वरूपात हल्ले करून ही ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. परंतु तरीही ज्या क्षमतेने इराणकडून प्रत्युत्तर दिले जात आहे ते अचंबित करणारे आहे. एका वृत्तानुसार इराणच्या आण्विक तळावरही हल्ला झाला आहे त्यातून अॅटोमिक रेडिएशन सुरू झाले किंवा कसे या वृत्ताची शहानिशा केली जात आहे. हे सगळे विनाशकारी रिपोर्टिंग ऐकल्यानंतर या युद्धाचा शेवट नेमका काय होईल याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. अशा संघर्षाच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाची यंत्रणा कुठे तोंड लपवून बसलेली असते हे कळत नाही. जगातला कुठलाही संघर्ष थांबवण्याची क्षमता संयुक्त राष्ट्राकडे नाही हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. युद्धखोर इस्रायल आणि अमेरिका आणि त्यांना पाठिंबा देणारे युरोपियन देश जगात हवे तिथे दादागिरी करू शकतात. कुठल्याही राष्ट्रप्रमुखाला ते ठार मारू शकतात किंवा त्याला उचलून आणू शकतात हे जे चित्र पाहायला मिळते आहे ते निराशाजनक आहे. या देशांच्या दादागिरीला आवर घालण्याची क्षमता ज्या देशांमध्ये आहे ते देशही आजच्या या संघर्षाचे मूकनिदर्शक बनून राहिले आहेत हे पाहणे आणखीनच क्लेशदायक ठरले आहे. अर्थात, इराणच्या बाजूने रशिया आणि चीन यांनी सक्रियपणे या संघर्षात उतरणे म्हणजे तिसर्या महायुद्धाला आमंत्रण देणे ठरणार आहे, त्यामुळे या दोन प्रमुख शक्तिशाली देशांनी इराणच्या बाजूने प्रत्यक्ष मैदानावर उतरावे अशी जगाची अपेक्षा नसली तरी इस्रायल आणि अमेरिकेच्या दादागिरीला आळा घालण्याची शिष्टाई तरी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करायला हवी होती. पण अद्याप चीन किंवा रशिया यापैकी एकाही देशाने इराणवर जो महाभयंकर प्रपात ओढवला आहे त्याविषयी आपली स्पष्ट प्रतिक्रियाही अद्याप दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर सर्व युद्धखोर देशांच्या प्रमुखांना सद्बुद्धी सुचो आणि हा संहार त्वरित बंद होवो अशी प्रार्थना करण्यापलीकडे बाकी जगाच्या हातात काही राहिलेले दिसत नाही.