अग्रलेख : काहीच वाटेनासे झाले आहे
अगदी परवाचीच बातमी आहे की, देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अशी माहिती सादर केली आहे की रशियन लष्करामध्ये भरती झालेल्या भारतीय युवकांपैकी (Indian Army) 49 युवक रशिया आणि युक्रेन युद्धात मारले गेले आहेत.

Indian Army : या देशाला चारही बाजूने समस्यांनी इतके घेतले आहे की या देशातल्या नागरिकांवर नेमकी जी स्थिती ओढवली आहे त्याचे आता कोणाला काहीच वाटेनासे झाले आहे. अगदी परवाचीच बातमी आहे की, देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अशी माहिती सादर केली आहे की रशियन लष्करामध्ये भरती झालेल्या भारतीय युवकांपैकी (Indian Army) 49 युवक रशिया आणि युक्रेन युद्धात मारले गेले आहेत.
दुसरा देश तिसर्या देशाशी युद्ध करताना भलत्याच देशाचे नागरिक तेथे सैनिक (Indian Army) म्हणून सहभागी होतात आणि त्यात शहीद होतात असा भयंकर प्रकार निदान स्वतंत्र भारतात तरी यापूर्वी कधी ऐकायला मिळाला नव्हता.
आता या देशात तेही घडत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 217 भारतीय युवक रशियन लष्करात (Indian Army) भरती झाले आहेत. तथापि हा आकडा त्याहीपेक्षा खूप अधिक असावा असे अनेकांचे म्हणणे आहे. शहीद झालेल्या भारतीय युवकांची संख्या जर 49 इतकी असेल तर त्यात भरती झालेल्या भारतीय युवकांची संख्या 217 पेक्षा निश्चितच अधिक असणार असे काहींचे म्हणणे आहे.
या देशातील फक्त उच्च बुद्धिमत्ता असलेले युवकच देश सोडून परदेशात नोकरी करायला जात असल्याचे चित्र आपण इतकी वर्षे पाहत आलो आहोत, पण आज देशातला श्रीमंत आणि उद्योगपती वर्गही मोठ्या प्रमाणात देशातून पलायन करत असल्याच्या बातम्या मधल्या काळात खूप वाढल्या होत्या आणि आता तर भारतात भारतीय सैन्यात भरती होणे हा अजिबातच लाभाचा सौदा नसल्याने भारतीय युवक चक्क आसपासच्या देशांमध्ये पलायन करून तेथील सैन्यांमध्येच भरती होत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत.
मध्यंतरी लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी असे म्हटले होते की ‘भारतीय लष्करात सहभागी होण्यात कोणतेही उज्ज्वल भवितव्य उरले नसल्याने गुरखा युवक चक्क चीनच्या लष्करात सामील होत आहेत.’ सोनम वांगचुक यांनी जाहीरपणे हा दावा केल्याने त्यावर सहजासहजी शंका व्यक्त करता येणार नाही.
अर्थात, भारतीय युवक चीनच्या लष्करात सामील झाल्याच्या वृत्ताला भारत सरकारकडून अजून तरी अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पण चीन आज आपला शत्रू देश असल्याने त्यात भारतीय गुरखा युवक लष्करी जवान म्हणून सहभागी होत असेल तर भारतासाठी तो गंभीरच मामला ठरतो. भारतीय युवक रशियातील लष्करात भरती झाल्याच्या बातमीला आता भारत सरकारने अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.
रशियन लष्करातील भारतीय युवकांच्या भरतीचे मुख्य कारण असे सांगितले जाते की, तेथे लष्करी सेवेसाठी आकर्षक आर्थिक मोबदला दिला जातो. रशियन लष्करामध्ये भरती होणार्या जवानाला भारतीय रुपयात दरमहा अडीच लाख रुपये इतका पगार मिळतो, तसेच वर्षाला पाच लाख रुपये इतका बोनस दिला जातो आणि तेथील युद्धात मरण आल्यास शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सुमारे दीड कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई दिली जाते.
या आकर्षक आर्थिक लाभाच्या कारणामुळेच भारतीय युवकांनी हा मार्ग पत्करला असावा असे सांगितले जात आहे. भारतात आता नियमित स्वरूपाची लष्कर भरती जवळपास बंद झाली असून त्या ऐवजी आता अग्निवीर म्हणून केवळ चार वर्षांच्या कंत्राटी सेवेसाठी भारतीय युवकांना लष्करात भरती केले जात आहे.
या चार वर्षांच्या सेवेत वीरमरण आले तर संबंधित जवानाच्या कुटुंबाला शहीद जवानाच्या संबंधात जे आर्थिक लाभ मिळतात ते नाकारले गेले असून या संबंधात काही प्रकरणे कोर्टातही दाखल झाली आहेत.
चार वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर अर्थातच भारतीय जवानाला पेन्शनही मिळणार नाही. त्यामुळे लष्कर भरतीसाठी खूप परिश्रम करून तयारी करणार्या हजारो तरुणांमध्ये यामुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निवीर योजनेला देशभरातील युवकांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. ठीकठिकाणी त्या योजनेच्या विरोधात निदर्शनेही झाली.
देशातल्या अनेक नामवंत लष्करी तज्ज्ञांनीही अशा स्वरूपाच्या लष्कर भरती योजनेला विरोध दर्शवला होता, पण सरकारने आपला हेका सोडला नाही आणि भारतीय लष्करातील पूर्ण वेळ स्वरूपाची जवानांची भरती बंदच ठेवली. याच पार्श्वभूमीवर भारतीय युवक आता आसपासच्या देशांमध्ये स्थलांतरित होऊन तेथील लष्करात भरती होत असतील तर भारतासाठी हा प्रकार लांछनास्पद म्हटला पाहिजे.
या देशातल्या प्रत्येक घटकावर आज इतकी भीषण स्थिती ओढवली आहे की त्याची दखल प्रसारमाध्यमांमध्येही घेतली जाताना दिसत नाही. देशाच्या संसदेमध्ये त्यावर गांभीर्याने चर्चा होते आहे आणि सरकार त्याला संवेदनशीलपणे प्रतिसाद देते आहे असे चित्र दिसणंही जवळपास बंद झाले आहे. देशातले असे भीषण सामाजिक प्रश्न आता संघटितपणे धसास लावण्याची ताकदही लोकांकडे उरलेली दिसत नाही.
कारण आपल्यावरील परिस्थितीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार्या लोकसमूहांना सरकारकडून बळाचा वापर करून प्रतिबंधित केले जाते किंवा अशा स्वरूपाचे आंदोलन करणार्या लोकांना ‘अर्बन नक्षल’ किंवा ‘पाकिस्तानप्रेरित’ अशा उपमा दिल्या जातात. त्यातून अन्यायग्रस्त आंदोलकांचे खच्चीकरणच केले जात आहे. देशातली एकूणच सगळी स्थिती आता चिंता करण्याच्याही पलीकडे जाताना दिसत आहे, हे दुर्दैव आहे.






