Benjamin Netanyahu: इराणसोबत चर्चा सुरु असतानाच बेंजामिन नेतान्याहू रुग्णालयात दाखल ; नेमकं काय झालं अचानक?, वाचा
Benjamin Netanyahu: आखातातील युद्ध लवकरच संपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. यासाठी अमेरिका इस्रायल इराणसोबत शांतता चर्चा करण्यावर भर देत आहेत.

Benjamin Netanyahu: आखातातील युद्ध लवकरच संपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. यासाठी अमेरिका इस्रायल इराणसोबत शांतता चर्चा करण्यावर भर देत आहेत. त्यातच या चर्चेदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दातांच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. इंग्रजी वृत्तपत्रानुसार, पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करून,”नेतान्याहू यांना हदासाह ऐन केरेम वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले असून, त्यांच्यावर दातांचे उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारांचे संपूर्ण स्वरूप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.” असे म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, नेतान्याहू यांची प्रकृती सध्या चांगली असून डॉक्टर त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत. ७६ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू यांची प्रकृती गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. गेल्या महिन्यात, त्यांनी एका विस्तृत सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले होते की, त्यांच्या प्रोस्टेटमध्ये एक घातक गाठ (ट्यूमर) आढळून आली आहे.
त्यांनी सांगितले की, रेडिएशनद्वारे त्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. नेतान्याहू यांनी असा दावाही केला की, त्यावेळी इराणसोबत असलेल्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे त्यांनी ही माहिती आधी उघड केली नाही. (Benjamin Netanyahu)
त्यांना वाटले की, शत्रू देश या माहितीचा गैरवापर करू शकतात आणि त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यानंतर त्यांनी आपला आरोग्य अहवाल प्रसिद्ध केला. त्यांच्या कर्करोगाचे निदान आणि उपचारांशी संबंधित एक स्वतंत्र दस्तऐवज देखील सार्वजनिक करण्यात आला.
नेतान्याहू यांच्यावर अनेक वेळा उपचार (Benjamin Netanyahu)
गेल्या काही वर्षांत, नेतान्याहू यांच्यावर विविध आरोग्य समस्यांसाठी अनेक वेळा उपचार झाले आहेत. जुलै २०२३ मध्ये, त्यांच्या शरीरात पेसमेकर बसवण्यात आला. मार्च २०२४ मध्ये त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्यावर प्रोस्टेट काढण्याची शस्त्रक्रियाही झाली.
जुलै २०२३ मध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि सुरुवातीच्या अहवालानुसार, रामात गान येथील शेबा मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेवर (डिहायड्रेशन) देखरेख ठेवली जात होती. मात्र, नंतर रुग्णालयाने स्पष्ट केले की, त्यांच्या त्वचेखाली एक हार्ट मॉनिटर बसवण्यात आला होता.






