पुण्यातून थेट युरोपला; निलेश घायवळ परत येण्याची वाट पहावी लागणार

पुणे – कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेल्या गुंड निलेश घायवळ याचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या तपासात युरोप पर्यंत पोहोचले आहेत. त्याचे लंडनमध्ये आलिशान घर, मुलगा हाय-फाय शाळेत शिकतो अशा चर्चेला उधाण आले असतानाच, प्रत्यक्षात घायवळ लंडनमध्ये नसून तो युरोपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युरोपच्या व्हिसावर तो तब्बल २९ देशांमध्ये फिरु शकतो. तेथे दुसऱ्या देशात प्रवेश करताना पासपोर्टची विचारणाही केली जात नाही. तसेच युरोपमध्ये फिरण्यासाठी टुरिस्ट व्हिसा १५ दिवस ते तीन महिने मिळू शकतो. यामुळे लूक आऊट नोटीस काढली तरी पुणे पोलिसांना तो स्वत:हून भारत परत येण्याची वाट पहावी लागणार आहे.
गोळीबारातून ‘मोका’पर्यंत…
मागील आठवड्यात कोथरुडमध्ये किरकोळ वादातून खासगी कर्मचाऱ्यावर घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला, तर एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या तपासात निलेश घायवळ हा मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह आठ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावला.
तपासात धक्कादायक खुलासा झाला की, घायवळने आपल्या गुंडांना “टोळीची दहशत कमी होतेय, ती वाढवा” असा आदेश दिल्याचे समोर आले. यानंतर २६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर (एलओसी) जारी केला. पण तोपर्यंत तो परदेशात पलायन करून बसला होता.
शेंगेन क्षेत्रात २९ देश : मुक्त प्रवासाची सुविधा
युरोपातील एक मोठा करार मानल्या जाणाऱ्या शेंगेन करारानुसार सध्या २९ देश या क्षेत्राचा भाग आहेत. या करारामुळे नागरिक आणि पर्यटकांना या देशांदरम्यान पासपोर्ट तपासणीशिवाय मुक्तपणे प्रवास करता येतो.शेंगेन क्षेत्रातील देशांमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, झेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलँड, इटली, लाट्विया, लिक्टेंस्टाइन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश होतो. Nilesh Ghaywal |
‘निलेश घायवळ युरोपचा व्हिसाकाढून परदेशात गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र तो युरोपातील कोणत्या देशात गेला हे समजू शकले नाही. तो जेव्हा परत येईल तेव्हा चौकशीत त्याचा प्रवास उघड होईल.’ – संभाजी कदम (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ तीन) Nilesh Ghaywal |





