Pune News : शेतकऱ्यांचा आवाज दाबला! पुणे बाजार समितीच्या कारभारावर गंभीर आरोप

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सभेत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यात आला. संचालकांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणार्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना आरडा-ओरडा करून संबंधिताला खाली बसविण्यात आले. शेवटपर्यंत त्यांना शेतकर्यांचे प्रश्न मांडू दिले नाहीत.समितीची सभा हमाल भवनात पार पडली. यावेळी सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, गणेश घुले, संतोष नांगरे, नानासाहेब आबनावे आदी उपस्थित होते.
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याला समिती देत असणाऱ्या रक्कमेबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच याबाबतचा अर्ज न्यायालयात असताना चुकीच्या पद्धतीने सभापती, संचालक कारखान्याला पैसे देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर संचालकांनी आरडा-ओरडा करत काळभोर यांना खाली बसविले. तसेच काळभोर यांनी शेतकर्यांशी संबंधित २३ प्रश्नांचे पत्र समितीला दिले आहे. त्याबाबतही त्यांनी विचारणा केली.
मात्र त्याचेही उत्तरही देण्यास सभापती, सचिवांनी टाळाटाळ केली. हे प्रश्न सर्वसाधारण सभेतले नाहीत. त्यामुळे यासाठी नंतर भेटा असे सांगण्यात आले. त्यानंतरही काळभोर खाली बसले नाहीत. यामुळे त्यांना आरडा-ओरडा करून खाली बसविण्यात आले.यशवंत साखर कारखान्याच्या जागेचा जो व्यवहार झाला, त्यास पणन संचालक, साखर सायुक्तांची परवानगी नाही. तरीही बाजार समिती कारखान्याकडे पैसे वर्ग करत आहेत.
समिती शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे की जागेची खरेदी-विक्री करण्यासाठी आहे. बाजारात विक्रीसाठी शेतीमाल घेवून येणार्या शेतकर्यानां साधे पार्किंग नाकारणारे संचालक दुसरीकडे अजित पवार यांचे नाव वापरून कोटीत व्यवहार करत आहेत. अशा गैरकारभाराला उपमुख्यमंत्र्यांची परवानगी आहे का? असा प्रश्नही काळभोर यांनी उपस्थित केला. या सभेत बाजार घटकांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागातील प्रश्न मांडले. मात्र, त्याला कोणीही उत्तर दिले नाही.
अजित पवारांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा..
बाजार समितीचे सभापती, संचालक अजित पवार यांचे नाव वापरून गैरकारभार करत आहेत. त्यामुळे अजित पवारांनी बारामती बाजार समितीप्रमाणेच पुणे बाजार समितीकडे लक्ष द्यावे. यशवंत कारखान्याला समिती देणार असलेले कोट्यवधी रूपये थांबवावे. बाजारातील शेतकरी, आडते, व्यापार्यांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा येत्या आठ दिवसांत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर यांनी दिला.
घाई गडबडीत संपविली सभा..
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बाजारातील दैनंदिन व्यवहारातील त्रृटी आणि विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे प्रश्न उपस्थित करणार्यांना बोलू न देता सभापती प्रकाश जगताप यांनी हातात माईक घेवून समारोपाच्या भाषणाला सुरूवात केली, तर सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सभापतीला माईक दिला. उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना बगल देत घाई गडबडीत सभेचा समारेप केला.





