French Open 2025 : नोव्हाक जोकोविचचा ऐतिहासिक विजय, जॅनिक सिनेरचा अजिंक्य प्रवास!

French Open 2025 Quarterfinals Updates : नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने चौथ्या फेरीत ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीचा ६-२, ६-३, ६-२ असा पराभव करून स्पर्धेत त्याचा १०० वा विजय नोंदवला. या कामगिरीसह, जोकोविच फ्रेंच ओपनमध्ये १०० विजय मिळवणारा फक्त दुसरा खेळाडू बनला आहे, पहिला खेळाडू राफेल नदाल आहे, ज्याच्या नावावर ११२ विजय आहेत. या विजयासह, जोकोविचने सलग १६ व्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
आता त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होईल, जो टॅलन ग्रिक्सपूर दुखापतीमुळे निवृत्त झाल्यानंतर पुढच्या फेरीत पोहोचला आहे. जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्हने सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या शेवटच्या आठमध्ये प्रवेश केला आहे. चौथ्या फेरीच्या सामन्यात, त्याचा प्रतिस्पर्धी टॅलन ग्रिक्सपूरने पोटाच्या स्नायूच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सेटमध्ये ६-४, ३-० अशा स्कोअरवर सामना सोडला, ज्यामुळे तो उपांत्यपूर्व सामन्यात पोहोचला.
Win 100 at Roland Garros. My new favorite number 😆. Quarterfinals idemooo pic.twitter.com/kV3Z83FTIR
— Novak Djokovic (@DjokerNole) June 2, 2025
झ्वेरेव्हने पहिल्या सेटमध्ये चुकून गिळली माशी –
या सामन्यादरम्यान एक मजेदार घटना घडली, जेव्हा झ्वेरेव्हने पहिल्या सेटमध्ये चुकून माशी गिळली, ज्यामुळे खेळ काही काळ थांबला होता. आता झ्वेरेव्हचा सामना क्वार्टर फायनलमध्ये सर्बियन खेळाडू नोव्हाक जोकोविचशी होईल. झ्वेरेव्ह आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत १३ सामने झाले आहेत, त्यापैकी झ्वेरेव्हने ५ वेळा विजय मिळवला आहे.
सिनेर उपांत्यपूर्व फेरीत दाखल –
इटालियन टेनिसपटू जॅनिक सिनेर शानदार कामगिरी करत आहे. त्याने चौथ्या फेरीत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा ६-१, ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयासह, सिनेरने ग्रँड स्लॅममध्ये सलग १८ वा विजय नोंदवला आहे आणि आतापर्यंत स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कझाकस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिकशी होईल, ज्याने पाचव्या मानांकित जॅक ड्रेपरला हरवून पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.





