सातारा – करोनामुळे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत केंद्र शासनाने देशात संपूर्ण लॉकडाऊन केला होता. या काळात सर्व व्यवहार, व्यवसाय बंद असल्याने व्यापारी वर्गाची आर्थिक उलाढाल ठप्प होती. या व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक मिळकतींच्या घरपट्टीमध्ये कायद्यानुसार किमान तीन महिन्यांची देण्याबाबत पालिका स्तरावर तातडीने निर्णय घेण्याची सूचना दिली आहेत. जे व्यापारी 2020-21 ची घरपट्टी थकबाकीसह भरतील किंवा ज्यांनी ती भरली असेल, त्यांना पुढील आर्थिक वर्षात तीन महिन्यांच्या व्यावसायिक घरपट्टीची रक्कम माफ करण्याबाबतची सूचना पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, करोनामुळे एप्रिल ते जूनअखेर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. व्यापारी, व्यावसायिक हा त्या त्या क्षेत्राच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. त्यांच्या व्यावसायिक धाडसामुळेच त्या त्या क्षेत्राचा विकास होतो. म्हणूनच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याप्रमाणे व्यापारीही जगला, तरला तरच समाज टिकेल. करोनामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून सर्वांचे आर्थिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक खच्चीकरण होत आहे. त्यामध्ये व्यापारी, व्यावसायिकही भरडले गेले आहेत. त्यांना त्या काळात घरपट्टीमध्ये सवलत दिली पाहिजे. त्यामुळे पालिका हद्दीतील व्यावसायिक मिळकतींवरील एप्रिल ते जूनअखेरची घरपट्टी माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन, त्याची अंमलबजावणी अटीशर्तींसह करावी, अशी सूचना पालिका प्रशासनास दिली आहे.