नवी दिल्ली – देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी कुपवाडा (Kupwada) जिल्ह्यातील टिटवाल येथील शारदा मंदिरात देवीची (Sharad Temple) पुजा होत नव्हती. दहशतवादी संघटनांचा दबाव आणि सततचे तंग वातावरण यामुळे विशेषत: दीपावलीला या मंदिरात पूजा (Diwali puja) होत नसे. मात्र, रविवारी 76 वर्षांत प्रथमच टिटवाल येथील शारदा मंदिरात पूजा-प्रार्थना करण्यात आली.
जम्मू-काश्मीरातही दिवाळीचा (Jammu kashmir diwali) सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह दिसून येत होता. लोकांनी रंगीबेरंगी दिवे लावले. घरे आणि दुकानांमध्ये पूजा झाल्यानंतर लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पूजा आटोपल्यानंतर लहान मुले व ज्येष्ठांनी फटाके वाजवले. यावेळी आकाश प्रकाशाने उजळून निघाले.
टिटवाल येथील शारदा मंदिर एलओसीला (Sharad temple on LOC) लागून आहे. ‘सेव्ह शारदा कमिटी’चे संस्थापक आणि प्रमुख रवींद्र पंडिता यांनी सांगितले की, 75 वर्षांत प्रथमच दिवाळीला येथे पूजा झाली. 75 वर्षांनंतर लोकांना देवीचे दर्शन करायला मिळाले ही खूप आनंदाची बाब आहे. 1947 पूर्वी या मंदिरात आणि गुरुद्वारामध्ये दिवाळी साजरी केली जात होती. बरोबर 75 वर्षांनंतर हे पुन्हा घडत आहे.
या मंदिराच्या उभारणीचे काम शारदा यात्रा मंदिर समितीने गेल्या वर्षीच सुरू केले होते. यापूर्वी, समितीने 2 डिसेंबर 2021 रोजी सुमारे एक एकर भूखंडाचे सीमांकन करून भूमिपूजन केले होते. ज्या जमिनीवर हे मंदिर बांधले आहे ती जागा स्थानिक लोकांच्या सहकार्याने परत मिळवण्यात आली. त्यात एक धर्मशाळा आणि गुरुद्वारा असायचा.
1947 मध्ये आदिवासींनी हे मंदिर जाळले होते आणि फाळणीनंतर 1948 मध्ये शारदा पीठाची यात्रा बंद करण्यात आली. गेल्या वर्षी स्थानिक मुस्लिम समाजाने धर्मशाळेची जमीन काश्मिरी पंडितांना परत केली होती आणि सेव्ह शारदा समिती काश्मीरच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने येथे गुरुद्वारा, शारदा मंदिर आणि मशीद बांधली होती.