पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराने जोर धरला असून, प्रमुख नेत्यांच्या सभा आणि रोड शोमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेनंतर पुण्यात रोड शोसाठी उपस्थिती लावली. दरम्यान, भोसरी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आगीची घटना घडली. भोसरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू असतानाच एका इमारतीवर फटाके उडवताना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे संबंधित इमारतीवरील मोबाईल टॉवर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रोड शोदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना रोखण्यासाठी दोर लावले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांनी लावलेला दोऱ्यांचा वेढा काढण्याचे निर्देश दिल्याचंही पाहायला मिळालं.