पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०२) मिलींद मोहिते यांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल ७०६ गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) अंतर्गत कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या गुन्हे अभिलेखांचा आढावा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ, धमकी, बेकायदेशीर अग्निशस्त्र व लोखंडी शस्त्रांचा वापर, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, खंडणी, बेकायदेशीर दारू विक्री, दहशत माजवणे तसेच सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश आहे. ही कारवाई स्वारगेट (१०८), सहकारनगर (१०७), पर्वती (१००), बिबवेवाडी (१००), मार्केटयार्ड (५९), भारती विद्यापीठ (१२५) आणि आंबेगाव (१०७) या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर करण्यात आली असून एकूण आकडा ७०६ इतका आहे. पोलिसांनी दिनांक १५ जानेवारी रोजी आदेश काढून संबंधित आरोपींना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत, परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ, स्वारगेट, आंबेगाव, पर्वती, मार्केटयार्ड, बिबवेवाडी व सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश, वास्तव्य, सार्वजनिकरित्या वावरणे, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा मिरवणुकीत सहभागी होणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अशाच स्वरूपाची कारवाई यापूर्वी १० जणांविरुद्धही करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.