मुंबईः शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला कायदेशीर बाबींमध्ये अडकविण्यासाठी शिवसेनेनं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज पुन्हा एकदा 16 आमदारांना नोटीस पाठवली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी 16 आमदारांना शेवटचं अल्टिमेटम दिलं असून सोमवारी संध्याकाळपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याच्या सूचना केल्या आहेत. शिंदे गटातील आमदारांची यावर काय भूमिका राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे पक्षातील ३० हून अधिक आमदारांसह गुवाहटीत आहेत. यापैकी 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी आमदारांना नोटीस पाठवली आहे.
दरम्यान दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरच अविश्वास ठराव दाखल केला आहे. अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन आमदारांना निलंबित करू नये, अशी मागणी करणारं पत्र दिलं आहे.
नोटीस पाठविण्यात आलेले आमदार
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, तानाजी सामंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील.