FIDE Candidates 2024 : प्रज्ञानंदकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा – मॅग्नस कार्लसन

FIDE Candidates 2024 :- कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीयांना विजेतेपदाची फारशी संधी दिसत नसली, तरी प्रज्ञानंदकडून मला चांगली कामगिरी अपेक्षित आहे. विजेतेपदासाठी फॅबियानो कारूआना आणि हिकारू नाकामुरा हे प्रमुख दावेदार आहेत, असे मत पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने व्यक्त केले.
कॅन्डिडेट्स स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपद लढतीत जगज्जेत्या आव्हान देण्याची संधी मिळेल. कॅन्डिडेट्सच्या खुल्या विभागातील सहभागी आठ बुद्धिबळपटूंपैकी तीन भारतीय आहेत. यात आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश आणि विदित गुजराथी यांचा समावेश आहे.
गुकेश विजेतेपदाचा दावेदार आहे असे मला वाटत नाही. तो काही चांगले निकाल नोंदवू शकेल, पण काही सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागू शकेल. तो खूप वाईट कामगिरी करेल असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्याच्याकडून फार अपेक्षाही केल्या जाऊ शकत नाही, असे गुकेशविषयी कार्लसन म्हणाला. तसेच आर. वैशालीकडूनही मला मोठ्या यशाच्या अपेक्षा आहेत, असेही त्याने म्हटले आहे.





