Casablanca Chess Variant Tournament 2024 : मॅग्नस कार्लसन ठरला विजेता…

Casablanca Chess Variant Tournament 2024 : पाच वेळचा विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) कासाब्लांका चेस वैरिएंट स्पर्धेचे (Casablanca Chess Variant Tournament) विजेतपेद पटकावले आहे. त्याचबरोबर पाच वेळचा विश्वविजेता भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) तिसऱ्या स्थानावर राहिला.
आनंदचा कार्लसनसोबतचा स्पर्धेतील दुसरा सामना अनिर्णित राहिला. आनंदने इजिप्तच्या अमीन बासेमचा पराभव केला. या स्पर्धेतील त्याचा हा एकमेव विजय ठरला. कार्लसनने सहा फेऱ्यांमध्ये साडेचार आणि आनंदने तीन गुण मिळवले. अमेरिकेचा हिकारू नाकामुरा साडेतीन गुणांसह दुसऱ्या तर बासेम एका गुणासह चौथ्या आणि शेवटच्या स्थानावर राहिला.
पांढऱ्या मोहऱ्यांसह आनंदने कार्लसनविरूध्द खेळला ड्रॉ…
ही अनोखी स्पर्धा एका नवीन प्रयोगावर आधारित होती. यामध्ये बुद्धिबळ जगतातील ऐतिहासिक सामन्यांतील बरोबरीची स्थिती (ड्रा) चार खेळाडूंसमोर ठेवण्यात आली होती. त्यांना दिलेल्या पोझिशनपासून खेळाला सुरुवात करून सामना पुढे न्यायचा होता. कार्लसनने पहिल्या फेरीत आनंदचा पराभव केला, परंतु दुसऱ्या फेरीत अलेक्झांडर अल्काइन आणि डॉ. मॅक्स युवे यांच्यातील 1935 च्या जागतिक स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातील पोझिशनपासून खेळ सुरू करण्यात आला होता. आनंद येथे पांढऱ्या मोहऱ्यासह चांगल्या स्थितीत होता, पण कार्लसनने आपल्या हाथीचा बळी देत खेळ बरोबरीकडे (ड्रा) नेला.
पाचव्या फेरीत नाकामुरा आणि आनंद यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला, तर कार्लसनने अमीनचा पराभव केला. सहाव्या फेरीत कार्लसन-नाकामुरा यांनी बरोबरी साधली आणि आनंदने अमीनचा पराभव केला.
World Para Championships 2024 : पॅरा ॲथलीट दीप्तीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी….
कार्लसन या फॉरमॅटला मनोरंजक म्हटले…
कार्लसनने विजयानंतर सांगितले की, “हा एक मनोरंजक फॉरमॅट होता. त्याला नक्कीच पुन्हा सहभागी व्हायला आवडेल. मजेशीर गोष्ट अशी होती की, तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या मोहऱ्यासह खेळत आहात की नाही हे येथे महत्त्वाचे नव्हते, कारण दोन्ही स्पर्धाकाच्या पोझिशन्स समान होत्या आणि दोघांना समान संधी होत्या.”






