World Rapid & Blitz Chess C’ship 2024 | परिधान केलेल्या जिन्सवरून दंड अन् मॅग्नस कार्लसनने घेतली स्पर्धेतून माघार…

World Rapid & Blitz Chess C’ship 2024 | अव्वल मानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) स्पर्धेदरम्यान परिधान केलेली जीन्स बदलण्यास नकार दिल्यानंतर त्याल्या दंड ठोठाविण्यात आला. यानंतर, कार्लसनने जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानेही याबद्दल माहिती दिली आहे. फेडरेशनने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या ड्रेसकोड बद्दल काही नियम आहेत. ज्यानुसार, जिन्स घालण्यास बंदी आहे. त्यानुसारच, कार्लसनला मुख्य लवादाने नियमाचे उल्लंघन झाल्याची माहिती दिली व त्याला 200 डॉलर्सचा दंड ठोठावताना त्याला कपडे बदलण्याची विनंती केली. दुर्दैवाने कार्लसनने नकार दिला आणि परिणामी त्याची नवव्या फेरीत खेळण्यासाठी निवड झाली नाही. हा निर्णय निष्पक्षपणे घेण्यात आला आणि सर्व खेळाडूंना समान लागू होतो, असे महासंघाने निवेदनात म्हटले आहे.
FIDE statement regarding Magnus Carlsen’s dress code breach
FIDE regulations for the World Rapid and Blitz Chess Championships, including the dress code, are designed to ensure professionalism and fairness for all participants.
Today, Mr. Magnus Carlsen breached the dress code… pic.twitter.com/SLdxBpzroe
— International Chess Federation (@FIDE_chess) December 27, 2024
नॉर्वेचा 34 वर्षीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कार्लसनने त्याच्या ‘टेक टेक टेक’ चेस अँपवरील व्हिडिओमध्ये या प्रसंगाबद्दल प्रतिक्रीया दिली. त्याने म्हटले की, मी 200 डॉलरचा दंड स्वीकारला आहे. परंतु प्रारंभी मी पँट बदलण्यास व स्पर्धा सोडण्यास नकार दिला होता. जर काही अडचण नसेल, तर मी उद्या माझे कपडे बदलेन, असेही अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कार्लसनने म्हटले. परंतू, अधिकाऱ्यांनी मला आत्ताच कपडे बदलावे लागतील असे सांगितले. त्यामुळे, ऐनखेळात कपडे बदलणे माझ्या तत्वात बसत नसल्याने मी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.
नियम सर्वांना सारखाच…
फेडरेशनने आपल्या निवेदनात म्हटले की, ‘ड्रेस कोड’ हा सर्व सहभागींसाठी व्यावसायिकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. शुक्रवारी ‘स्पोर्ट्स शूज’ परिधान करून ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याबद्दल स्पर्धेतील सहभागी इयान नेपोम्नियाच्चीलाही दंड ठोठावण्यात आल्याचेही महासंघाने यावेळी म्हटले आहे.





