FDA Raid Pimpri Chinchwad: तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये! शहरात एफडीएचे धाडसत्र; हॉटेल व्यावसायिकांचे दाबे दणाणले
FDA Raid Pimpri Chinchwad: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड विभागात धाडींचा धडाका; ११८ अन्न नमुने जप्त.

– इनुराद विश्वकर्मा
FDA Raid Pimpri Chinchwad : अन्न व औषध प्रशासना (एफडीए) कडून शहरात गेल्या एका वर्षभरात झालेल्या कारवाईच्या जवळपास निम्मी कारवाई अवघ्या चार महिन्यांतच करत शहरात धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे हॉटेल व खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानमालकांचे दाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्तपदी कारभार हाती घेतल्यापासून शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पिंपरी-चिंचवड विभागाच्या कामकाजाला वेग आल्याचे चित्र आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी एफडीएकडून तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी आस्थापनांची तपासणी करून नमुने संकलित केले जात आहेत.
नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना सुधारणा नोटिसा बजावण्यासोबतच तडजोड प्रकरणे आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार महिन्यांत झालेल्या कारवाईची आकडेवारी पाहता, प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’ दिसून येत आहे. तपासणी आणि कारवाईचा वाढलेला वेग अन्न व्यावसायिकांसाठीही धडकी भरवणारा ठरत आहे. १ एप्रिल २०२६ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत एफडीए पिंपरी-चिंचवड विभागाकडून तब्बल १७८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान ११८ नमुने संकलित करण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच आवश्यक सुधारणा करण्याची गरज असलेल्या आस्थापनांना ४० सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. त्याचबरोबर ५९ तडजोड प्रकरणे करण्यात आली असून, या कारवाईतून तब्बल २ लाख ६६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे अन्न आस्थापनांच्या तपासणीपासून ते नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईपर्यंत एफडीएकडून कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या संपूर्ण आर्थिक वर्षातील आकडेवारीशी तुलना केली असता यंदाच्या कारवाईचे चित्र अधिक ठळक होते. मागील संपूर्ण वर्षभरात एफडीए कडून ३७३ नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ३५५ नमुने प्रमाणित, तर १८ नमुने अप्रमाणित अथवा असुरक्षित आढळले. या कालावधीत ६८ तडजोड प्रकरणे करण्यात आली, तर दोन प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले होते.
दुकानदारांच्या दाबे दणाणले
अन्नपदार्थांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न आस्थापनांवर नियमित तपासणी आणि नमुना संकलन करणे ही एफडीएची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, यापूर्वीच्या तुलनेत सध्या तपासणी आणि कारवाईचा वाढलेला वेग हा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः तडजोड प्रकरणांची संख्या आणि दंडात्मक कारवाईकडे पाहता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे दुकानदारांचे दाबे दणाणले आहेत.






