Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Tukaram Mundhe : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनातील पाच अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. आणखी २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार असल्याची माहिती.

Tukaram Mundhe : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनात (FDA) मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विभागातील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी २१ अधिकाऱ्यांची विभागीय स्तरावर चौकशी केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आल्याने विभागात खळबळ उडाली आहे.
या पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश आज जारी करण्यात आले. विशेष म्हणजे, हे प्रकरण अलीकडचे नसून, संबंधित कारवाईचा प्रस्ताव जुलै महिन्यातच पाठवण्यात आला होता. आता त्यावर निर्णय घेत पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आणखी २१ अधिकाऱ्यांच्या कामकाजाची विभागीय स्तरावर चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, जाहिराती आणि उत्पादनांबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांच्या प्रकरणातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात प्रशासनाने तीन जणांना नोटीस बजावली होती. संबंधित तिघांनी नोटिसांना उत्तर देत आपली बाजू मांडली. प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पुढील निर्णयासाठी संयुक्त आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून संयुक्त आयुक्त स्तरावर या प्रकरणाची न्यायनिर्णयन प्रक्रिया सुरू होणार आहे. या सुनावणीनंतर संबंधितांवर कोणती कारवाई केली जाणार, हे स्पष्ट होईल.
या प्रकरणात अभिनेता अजय देवगण याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे जाहिरातींमधील दावे आणि त्यावर प्रशासनाकडून होणारी कारवाई याकडे लक्ष लागले आहे.
उत्पादनांच्या जाहिराती करताना ग्राहकांची दिशाभूल होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जाहिरातींमध्ये केले जाणारे दावे कायद्याने ठरवलेल्या नियमांनुसार असणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे संयुक्त आयुक्त स्तरावरील सुनावणीनंतर या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.





