Pune FDA Action: एफडीएचा मोठी कारवाई! पुण्यातील ५ प्रसिद्ध रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित…वाचा सविस्तर
Pune FDA Action: अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) पुणे जिल्ह्यातील १० रक्तकेंद्रे आणि ६ रक्तसाठवणूक केंद्रांना दणका; राज्यभरात एकूण ३८ केंद्रांवर कारवाई.

Pune FDA Action – अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) आता रक्तपेढी आणि रक्तसंकलन केंद्रावर वाॅच आहे. तपासणीत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्तकेंद्राचा परवाना निलंबित केला. एप्रिल ते जून या काळात पुणे जिल्ह्यातील दहा रक्तकेंद्रे आणि सहा रक्तसाठवणूक केंद्रांवर कारवाई केली. ‘एफडीए’ने राज्यभरात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत २३ रक्तकेंद्रे आणि १५ रक्तसाठवणूक केंद्रांवर कारवाई केली.
यामध्ये २१ रक्तकेंद्रे आणि १३ रक्तसाठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित, तर दोन रक्तकेंद्रे आणि दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. एफडीएच्या तपासणीत पुणे जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्तकेंद्रात मंजूर तांत्रिक पर्यवेक्षक नसतानाही रक्तघटक तयार करण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. रक्ताच्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या. ‘प्लेटलेट्स’च्या नमुन्यांची तपासणी केलेली नव्हती.
काही रक्तपिशव्यांवर आवश्यक माहिती नव्हती; तसेच उपकरणे निर्जंतुक करताना तापमानाची नोंद ठेवली जात नव्हती. त्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला. औंध येथील मेट्रो रक्तकेंद्राबरोबरच देहूरोड येथील विमल चॅरिटेबल ट्रस्ट, मंगळवार पेठेतील कै. मधुकर सखाराम बीडकर रक्तकेंद्र, रास्ता पेठेतील पूना सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट, शिरूर येथील ओम रक्तकेंद्र या रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
केंद्रांमध्ये रक्तसाठवणूक विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरियल हॉस्पिटल, लोहगाव येथील साई श्रद्धा रक्तसाठवणूक केंद्र, उरुळी कांचन येथील श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर, बोरी पारधी (दौंड) येथील निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व कॅन्सर सेंटर, बारव (जुन्नर) येथील यशवंतराव चव्हाण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शिवाजीनगर येथील प्रथमा रक्तसाठवणूक केंद्र यांचे परवाने निलंबित करण्यात आले; तसेच बोरीपारधी (ता. दौंड) येथील पाटील हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटरचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.





