RTO Action: आरटीओचा मोठा निर्णय! १ जुलैपासून ‘या’ वाहनांवर होणार थेट दंडात्मक कारवाई
RTO Action: परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन; प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची माहिती.

RTO Action – राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. अशा एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांवर मंगळवापासून (दि. 1 जुलै) दंडात्मक कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली.
जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या प्रत्येक वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हा नियम लागू केला आहे. परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी आगावू वेळ निश्चित करावी.
संबंधित वाहनधारकांनी 30 जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या वाहनधारकांनी मुदतीत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेतली नाही किंवा अपाईंटमेंट नोंदवली नाही. अशा वाहनांची 1 जुलेपासून रस्त्यावर वायू वेग पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
तसेच 1 हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. एचएसआरपी न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे एचएसआरपी न बसवलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात येणार आहेत.





