Fake Kidnapping: अपहरणाचा बनावट व्हिडिओ दाखवून उकळली खंडणी; पोलिसांनी १७ तासांत मुलीला झारखंडमधून शोधले
Fake Kidnapping: मुलीचा फोटो आणि माहिती असलेल्या पोस्टरचा वापर करून तयार केला बनावट व्हिडिओ; घाबरलेल्या पालकांनी तीन टप्प्यांत पाठविली रक्कम.

Fake Kidnapping – कोंढवा परिसरातील बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा बनावट व्हिडिओ दाखवून सायबर चोरट्यांनी मुलीच्या वडिलांकडून १५ हजार रुपयांची खंडणी उकळली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या १७ तासांत मुलीला झारखंडमधून शोधून काढत तिला पालकांच्या स्वाधीन केले. मूळचे बिहारचे असलेले फिर्यादी कुटूंब काकडे वस्तीत वास्तव्यास असून त्यांची मुलगी बेपत्ता आहे. अज्ञाताने तिला फूस लावून पळवल्याचा संशय असून पालकांना अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
याचवेळी फिर्यादींच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. त्यात मुलगी ताब्यात असल्याची धमकी देत ५० हजारांची मागणी केली. व्हिडिओमध्ये मुलीचे हात-पाय बांधलेले दृश्य दाखविले. घाबरलेल्या वडिलांनी तीन टप्प्यांत प्रत्येकी पाच हजार रुपये, असे १५ हजार संबंधित खात्यावर पाठविले. यानंतर पोलिसांना तपासात मुलगी आजीकडे असल्याचे आढळले. यानंतरही सायबर चोरट्याने बक्षीस म्हणून आणखी पैशांची मागणी केली. दरम्यान, ही मुलगी पुणे रेल्वे स्थानकावरून हावड्याकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे आढळले. टाटानगर (झारखंड) येथे रेल्वे पोलीस आणि टीसीच्या मदतीने कोंढवा परिसरात आजीच्या घरातून मुलीला ताब्यात घेतले.
पोस्टरचा वापर
शोधासाठी वडिलांनी मुलीचा फोटो, माहिती असलेले पोस्टर विविध व्हॉट्सअॅप समूहांवर प्रसारित केले होते. याचा आधार घेत चोरट्यांनी बनावट अपहरणाचा व्हिडिओ तयार केला. मुलगी आपल्या ताब्यात असल्याचा बनाव करून खंडणी उकळली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे आणि पथकाने केली.





