Fake Doctor: पदवी नसताना चालवायचे क्लिनिक; खराडी अन् वारजेत बोगस डॉक्टरांचा भांडाफोड
Fake Doctor: पुणे पालिकेच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची मोठी कारवाई; खराडी अन् वारजे परिसरात दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल.

Fake Doctor – वैद्यकीय पदवी अथवा वैध नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध पुणे महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध विभागाने कारवाई केली आहे. खराडी आणि वारजे माळवाडी परिसरातील या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेकडे प्राप्त तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीमार्फत अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. खराडीतील प्लॅटिनम टॉवरमधील श्री विघ्नहर्ता पॉलीक्लिनिकमध्ये धीरज दिलीप येवले (२९, रा. चाळीसगाव, जळगाव) हा जुलै २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत कोणताही वैध वैद्यकीय परवाना किंवा नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे तपासणीत आढळले.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजणकर यांच्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. येवले याने विश्रांतवाडी येथील कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोंदणीकृत महिला आयुर्वेदिक डॉक्टरच्या नावाचा नोंदणी क्रमांक व तपशील खोट्या पद्धतीने सादर करून नोकरी मिळवल्याचेही तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे तपास करीत आहेत.
डॉक्टरांचे शिक्के, प्रिस्क्रिप्शन बुक्स सापडले
वारजे माळवाडीतील गुरुकृपा क्लिनिकमध्ये उद्धव चव्हाण हा कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक अर्हता, पदवी किंवा वैद्यकीय परिषदेची नोंदणी नसताना नागरिकांना ॲलोपॅथीचे उपचार देत असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे आणि अन्न निरीक्षक अजित भुजबळ यांनी क्लिनिकची पाहणी केल्यानंतर विविध डॉक्टरांच्या नावाचे शिक्के, प्रिस्क्रिप्शन बुक्स, औषध खरेदीच्या पावत्या,
तसेच मोठ्या प्रमाणात आढळलेला औषधांचा साठा पंचनामा करून सील करण्यात आला. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आले आहे. क्लिनिकमध्ये बायो-मेडिकल वेस्टची नोंदणीही नसल्याचे समोर आले. डॉ. डमाळे यांच्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






