Nushrratt Bharuccha: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) आज इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मात्र, तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक रिजेक्शन, छोटे रोल आणि सततच्या संघर्षानंतर तिला खरी ओळख मिळाली ती ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटामुळे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी ती निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. तरीही आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने ही संधी मिळवली आणि त्यानंतर तिचं करिअरच बदलून गेलं. १७ मे १९८५ रोजी मुंबईत जन्मलेल्या नुसरत भरूचाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने शिक्षणही मुंबईतच पूर्ण केलं. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न घेऊन तिने अगदी कमी वयातच टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. २००२ साली ‘किट्टी पार्टी’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात झाली. या मालिकेत तिची भूमिका छोटी होती, पण कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा हा तिचा पहिला अनुभव होता. यानंतर नुसरत ‘सेव्हन’ या टीव्ही मालिकेतही झळकली. या मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली होती. मात्र, छोट्या पडद्यावर तिला फार मोठं यश मिळालं नाही. त्यामुळे तिने चित्रपटांकडे मोर्चा वळवला. २००६ साली ‘जय संतोषी मां’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट तिच्यासाठी मोठी संधी होती, पण बॉक्स ऑफिसवर तो फारसा चालला नाही. त्यामुळे नुसरतला पुन्हा संघर्ष करावा लागला. (Nushrratt Bharuccha) Nushrratt Bharuccha अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती सतत ऑडिशन्स देत राहिली. अनेक ठिकाणी तिला नकार मिळाले, पण तिने हार मानली नाही. तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो ‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट. या चित्रपटासाठी सुरुवातीला दुसऱ्या अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. नुसरतला या भूमिकेसाठी अनेक ऑडिशन आणि स्क्रीन टेस्ट द्यावे लागले. अखेर तिची निवड झाली आणि तिने संधीचं सोनं केलं. (Nushrratt Bharuccha) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नुसरतच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. तिची स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. ‘प्यार का पंचनामा’ सुपरहिट ठरला आणि नुसरतला बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली. त्यानंतर तिने ‘प्यार का पंचनामा २’मध्येही काम केलं आणि हा चित्रपटही यशस्वी ठरला. यानंतर ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. पुढे तिने ‘ड्रीम गर्ल’, ‘जनहित में जारी’, ‘राम सेतु’, ‘सेल्फी’ आणि ‘छोरी’सारख्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने स्वतःला सिद्ध केलं. नुसरत भरूचाचा प्रवास हा मेहनत, संयम आणि जिद्दीचं उत्तम उदाहरण मानले जाते. अनेक अडचणी आणि रिजेक्शनचा सामना करूनही तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज ती बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.