Manoj Jarange And Devendra Fadnavis : फडणवीसांच्या ओएसडी भेटीनंतरही मनोज जरांगे मोर्च्यावर ठाम, बैठकीत काय घडलं?

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 27 ऑगस्टपासून मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असली, तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजेंद्र साबळे यांनी 25 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे यांनी मोर्च्यावर ठाम असल्याचे सांगितले, पण चर्चेचा दरवाजा मात्र खुला ठेवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ओएसडी राजेंद्र साबळेंच्या भेटीत काय घडलं?
अंतरवाली सराटी येथे झालेल्या या बैठकीत राजेंद्र साबळे यांनी जरांगे पाटलांसोबत सुमारे एक तास चर्चा केली. ही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार झाली असून, तिचा उद्देश मुंबई मोर्च्याच्या मार्गाची माहिती घेणे आणि आंदोलनाच्या अडचणी जाणून घेणे हा होता.
साबळे यांनी स्पष्ट केले की, मी केवळ मोर्च्याच्या मार्गाची आणि अडचणींची माहिती घेण्यासाठी आलो आहे. मात्र, ही भेट गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी, जरांगे यांच्या मागण्या अंमलबजावणीसाठी तात्काळ कारवाईची अपेक्षा आहे.
भेटीनंतर साबळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी केवळ मनोज जरांगे यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो.” या भेटीमुळे सरकारने जरांगे यांच्याशी थेट संवाद साधण्याची तयारी दाखवली असल्याचे दिसते.
मनोज जरांगे मोर्च्यावर ठाम
या भेटीनंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि मुंबई मोर्च्यावर ठाम राहिल्याचे सांगितले. “राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर देखील मी मुंबईतील मोर्चावर ठाम आहे. अजून बोललोच नाही. तुमच्या समोरच चर्चा करणार,” असं जरांगे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “एक रस्ता आम्हाला द्या… कोणताही द्या… हजार रस्ते आहेत. एक द्या… मी मोर्चावर ठाम… अंमलबजावणी पाहिजे.
माझ्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, अंमलबजावणी करा…” जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला होता, पण आता ते म्हणतात, “परंतु उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार.” यामुळे 27 ऑगस्टपासून मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय कायम आहे, आणि गणेशोत्सवाच्या काळातही तो होईल.
जरांगे यांनी फडणवीस यांना फोन करून मराठा आरक्षणाबाबत बोलणी केल्याचेही सांगितले. “मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, आमचं बोलणंही झालं…” असं ते म्हणाले. मात्र, आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास मोर्चा काढण्याचा निर्धार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.





