Manoj Jarange । maratha reservation – मराठ्यांनी मुंबईत येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. ही मराठा समाजाच्या आरक्षणाची शेवटची लढाई असून ती आता मुंबईत होणार असल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जाहीर केले. बीड जिल्ह्यातील सभेत ते बोलत होते. मनोज जरांगे म्हणाले, सरकारने २६ ऑगस्टपर्यंत कायदेशीर चौकटीत मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मुंबईत आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीने सरकार हादरले पाहिजे. मुंबईत पोहोचल्यानंतर सरकारवर खरा दबाव येईल. लढाई आता मुंबईत होणार आहे. मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने आधी मान्य केले होते. पण आता आरक्षण दिले जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याचे गॅझेट लागू करावे, त्यातील ५८ लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच २९ जाती ओबीसीत आरक्षणामध्ये सामील करून घेतल्या. त्यांची मागणी नसतानाही त्यांना आरक्षण दिले. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही, ही पोटदुखी कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात मराठा समाजातील बांधवांना २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चलो मुंबई मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचे त्यांनी जाहीर केले. शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही त्यांची मागणी आहे. २७ ऑगस्ट रोजी जालन्यातील आपल्या मूळगावी अंतरवाली सराटी येथून ते या मोर्चाला सुरुवात करणार आहेत.