EPFO ची भव्य योजना, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5 पट वाढ होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान मासिक पेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि जीवनमानाचा वाढलेला खर्च लक्षात घेता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सध्याची १,००० रुपयांची किमान पेन्शन वाढवून ती ५,००० रुपये करण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. या प्रस्तावाला विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांनी मोठा पाठिंबा दर्शविला असून, या निर्णयामुळे निवृत्त व्यक्तींचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार आहे.
सध्या ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजना १९९५ अंतर्गत पात्र निवृत्त व्यक्तींना दरमहा किमान १,००० रुपये पेन्शन मिळते, जी गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहे. मात्र, ही अत्यल्प रक्कम दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसल्याचा सूर कामगार वर्गातून उमटत होता. या पार्श्वभूमीवर सरकार किमान पेन्शनमध्ये थेट पाच पट वाढ करण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य निर्णयाचा मोठा फायदा ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असलेल्या खासगी कर्मचाऱ्यांना, ईपीएस सेवा पात्रता पूर्ण करणाऱ्या निवृत्तांना आणि सध्या किमान पेन्शन घेत असलेल्या लाभार्थ्यांना होणार आहे. विशेषतः ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वाढ मोठा आधार ठरेल.
या प्रस्तावावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसले तरी, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात किंवा महत्त्वाच्या धोरणात्मक बैठकीत याची घोषणा होऊ शकते असे संकेत मिळत आहेत. पेन्शन वाढीसोबतच ईपीएफओ प्रशासन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीएफ काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि पेन्शन वितरणाचा वेग वाढवणे अशा इतर सुधारणांवरही काम करत आहे. मात्र, ही बाब सध्या विचाराधीन असल्याने कर्मचाऱ्यांनी केवळ अधिकृत सरकारी अधिसूचनांवरच विश्वास ठेवावा आणि आपल्या सेवा नोंदी अचूक ठेवाव्यात, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.





