मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांच्या कारवाईबाबत बॅफूटवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के सी वेणुगोपाल यांचा इशारा खरा ठरण्याची शक्यता आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेणार पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई होणार नसल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. के सी वेणुगोपाल यांनी मुंबईत म्हटले होते की काय कारवाई होणार हे भविष्यात ठरवले जाईल. त्यामुळे तुर्तास निलंबनाऐवजी आता या आमदारांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांकेतिक पद्धतीने काही आमदारांकडे बोट केले होते. त्यानंतर झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके , हिरामण खोसकर, मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर यांच्या नावाची चर्चा होऊ लागली होती. या पाच जणांव्यतिरिक्त आणखी दोन काँग्रेस आमदार कोण?, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याच दोन आमदारांना अभय दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.