EPFO 3.0 : कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation) आपल्या सेवांमध्ये मोठा तांत्रिक बदल करत असून ‘EPFO 3.0’ प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या प्रणालीमुळे PF काढणे, ट्रान्सफर करणे आणि क्लेम प्रक्रिया बँकिंग सेवांसारखी सोपी, जलद आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे. विशेष म्हणजे UPIद्वारे थेट पैसे काढण्याची सुविधा, कमी कागदपत्रे आणि रिअल-टाइम सेवा यामुळे कोट्यवधी सदस्यांना मोठा फायदा होणार आहे. EPFO 3.0 चे उद्दिष्ट काय? ही एक तांत्रिक सुधारणा असून जुनी प्रणाली अधिक आधुनिक, जलद आणि त्रुटीमुक्त बनवण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे सदस्यांना लहानसहान कामांसाठी EPFO कार्यालयाचे फेरे मारावे लागणार नाहीत आणि सर्व सेवा ऑनलाइन सहज उपलब्ध होतील. हेही वाचा – BJP Bengal Manifesto 2026: बेरोजगार तरूणांना 3 हजार रुपये भत्ता; महिलांच्या खात्यातही दरमहा 3 हजार, पहा भाजपच्या मोठ्या घोषणा महत्त्वाचे १० बदल : 1) पैसे काढण्याच्या तीन सोप्या श्रेणी – पूर्वी PF काढण्यासाठी १३ वेगवेगळे नियम होते. आता ते फक्त तीन गटांमध्ये विभागले आहेत. *अत्यावश्यक गरजा (आजारीपणा, शिक्षण, लग्न) *घराशी संबंधित गरजा (घर खरेदी, बांधकाम, कर्जफेड) *विशेष परिस्थिती (आपत्ती, आकस्मिक संकट) 2) किमान सेवा कालावधी एक वर्ष – आधी वेगवेगळ्या निकासींसाठी १ ते ७ वर्षांची अट होती. आता फक्त १२ महिन्यांची सेवा पूर्ण असली की PF मधून काही रक्कम काढता येईल. 3) नियोक्त्याच्या योगदानाचाही समावेश – आता कर्मचारीच नव्हे तर नियोक्त्याच्या (Employer) योगदानासह त्यावरील व्याजही काढता येणार आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी अधिक निधी उपलब्ध होईल. 4) ७५% रक्कम कागदपत्रांशिवाय – अनेक प्रकरणांत PF मधील ७५% रक्कम कोणतेही अतिरिक्त कागदपत्र न देता काढता येईल. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि वेळखाऊपणा कमी होईल. 5) बेरोजगारीत तत्काळ मदत – नोकरी गेल्यास PF मधील ७५% रक्कम लगेच काढता येईल, तर उर्वरित २५% रक्कम १२ महिन्यांनंतर मिळेल. 6) पूर्ण रक्कम कधी काढता येईल? ५५ वर्षांनंतर निवृत्ती, कायम अपंगत्व, नोकरीतून कमी करणे, स्वेच्छानिवृत्ती किंवा कायमचे परदेशात स्थलांतर अशा परिस्थितीत संपूर्ण PF रक्कम काढता येईल. 7) २५% रक्कम सुरक्षित ठेवणे बंधनकारक – निवृत्तीची बचत टिकवण्यासाठी किमान २५% रक्कम PF खात्यात ठेवणे आवश्यक असेल. यामुळे दीर्घकालीन बचत आणि कंपाउंडिंगचा फायदा मिळेल. 8) पेंशन (EPS) नियमात बदल – पेंशन फंड (EPS) रक्कम काढण्यासाठी आधी २ महिन्यांची अट होती, ती आता ३६ महिने करण्यात आली आहे. यामुळे १० वर्षांची सेवा पूर्ण करून नियमित पेन्शन मिळवण्यास प्रोत्साहन मिळेल. 9) UPI आणि ATMद्वारे थेट पैसे – UPI अॅपच्या माध्यमातून PF मधून थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. भविष्यात ATMद्वारेही रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे. 10) जलद क्लेम सेटलमेंट आणि ऑटो ट्रान्सफर – क्लेम सेटलमेंट अधिक वेगाने होईल. KYC पूर्ण असलेल्या सदस्यांचा PF नोकरी बदलल्यावर आपोआप ट्रान्सफर होईल आणि बॅलन्स रिअल-टाइममध्ये पाहता येईल. EPFO 3.0 मुळे PF सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि वापरकर्ता-अनुकूल होणार आहेत. विशेषतः डिजिटल सुविधा आणि UPIमुळे सदस्यांना त्यांच्या बचतीवर अधिक नियंत्रण मिळणार असून, निवृत्तीची सुरक्षितता कायम राखत गरजेच्या वेळी निधी सहज उपलब्ध होईल.