आळंदी – कऱ्हाडकर मठातील श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी (दि. 29) सांगता झाली.
सकाळी टाळ मृदंगाच्या निनादात “ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात भाविकांनी नगर प्रदक्षिणा केली. हभप गणेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि खादगावकर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होऊन सांगता झाली. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी भजनी मंडळ प्रमुख वाल्मिक नरहरी फड यांच्या हस्ते ग्रंथ सांगता पूजा आणि हभप बापूसाहेब महाराज पंढरपूर यांची पूजेची कीर्तन सेवा झाली. हभप श्रीनिवास महाराज उखळीकर यांनी सप्ताहाचे आयोजन केले होते.
सप्ताहात सात दिवस हभप बाळासाहेब महाराज लटपटे यांनी भागवत कथा कथन करून भाविकांना भगवत भक्तीत तृप्त केले. तसेच दैनंदिन कीर्तन, भजन, हरिपाठ, काकड आरती, हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उखळीकर महाराज दरवर्षी विविध धार्मिक ठिकाणी सप्ताह आयोजित करतात. यावर्षी आळंदी येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
भागवताचार्य हभप बाळासाहेब महाराज लटपटे, हभप परमेश्वर महाराज जायभाये, हभप रामकृष्ण महाराज सानप, हभप आत्माराम महाराज कुटे शास्त्री, हभप आसाराम महाराज बडे, हभप रविदास महाराज सिरसाठ, हभप बापुसाहेब महाराज पंढरपूर, हभप सुदाम महाराज पानेगांवकर, हभप गणेश महाराज उखळीकर यांची कीर्तन सेवा झाली.
यावेळी परभणी जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष रामराजे फड, माजी सरपंच भगीरथ फड, बांधकाम व्यावसायिक श्रीराम मुंडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप फड, यांसह खादगावकर ग्रामस्थ आणि परभणी, बीड जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सप्ताहात सहभागी झाले होते.