राजूर, {विलास तुपे} – कळसुबाई-हरिश्चंद्रगड परिसरात करण्यात आलेल्या शिरगणतीत दीड हजार पशुपक्षी आढळले. यामध्ये सर्वाधिक संख्या वानरांची असून, याच क्षेत्रात ७४३ विविध प्रकारचे पक्षी आढळले. दोन दिवस चाललेल्या या वन्यप्राणी गणनेत हरिश्चंद्रगड अभयारण्यात ५०८ वन्यप्राणी आढळून आले.
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात भंडारदरा विभागातील कोळटेभे, रतनवाडी, घाटघर, साम्रद, शिंगणवडी, पांजरे, उडदावणे येथील जंगलातील आठ पाणवठ्यावर, राजूर विभागातील शिरपुंजे, कुमशेत, पाचनई, अंबित, लव्हाळी, ओतूर, पळसुंदे व कोथळे येथील १७ पाणवठ्यावर गणना करण्यात आली.
अभयारण्य क्षेत्रात रानगव्याकरिता पोषक अधिवास उपलब्ध झाला आहे. अभयारण्यामधील इकोसिटी घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी या भागात वन्य पशुपक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या अभयारण्यात एकूण बारा बिबटे आढळून आले तर घाटघर येथील घाटनदेवी परिसरात एक रानगवा व तीन नीलगाय आढळून आल्या.
यासाठी भंडारदरा-कळसुबाई वन्यजीव क्षेत्रातील आठ पाणवठ्यांवर तर राजूर- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील १७ ठिकाणी ही शिरगणती करण्यासाठी मचाण उभारण्यात आले होते. बुद्धपौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांची गणना तेथे बसून करण्यात आली. प्रत्येक पाणवठ्यांवर वन्यजीव विभागाने आपले दोन ते तीन कर्मचारी तैनात केले होते.
दोन दिवस चाललेल्या या वन्यप्राणी गणनेत हरिश्चंद्रगड अभयारण्यात ५०८ वन्यप्राणी आढळून आले. यात वानरांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २२८ तर घोरपड आणि उदमांजर दिसून आले. याच क्षेत्रात ७४३ विविध प्रकारचे पक्षी आढळले. ५०८ बगळे, ११ घार यासह घुबड, भारद्वाज, बुलबुल, कावळे, रान कोंबडी, सुतार पक्षी, पारवे, होले,
पानकोंबडी, खंड्या, साळुंखे, कोतवाल, वटवाघुळ असे ७४३ विविध प्रकारचे पक्षी आढळून आले. भंडारदरा कळसुबाई अभयारण्य क्षेत्रात वन्य प्राण्यांमध्ये खार, माकड, रानगवा, नीलगाय, सांबर, रानमांजर, वानर, कोल्हा, मुंगूस, भेकर, बिबट असे एकूण ४९५ वन्य प्राणी दिसून आले. यात खार व माकडे यांची संख्या सर्वाधिक मिळून आली. याच अभयारण्यात विविध प्रकारचे ७०९ पक्षी आढळून आले.
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव याची नुकतीच शिरगणती झाली. अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा रेंजमधील सर्व सरपंच, पदाधिकारी तसेच तंबू कॅम्पेनिंग करणारे युवक यांची संयुक्त बैठक घेतली आहे.
रानगव्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. रानगवा अभयारण्यात येणे, हे शुभवर्तमान आहे. नीलगाय व गवा कोणालाही दिसल्यास त्याला कुठलाही त्रास देऊ नये – दत्तात्रय पडवळ, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग