Duleep Trophy 2024 : मुशीर भारतीय संघासाठी चांगला पर्याय – विजय दहिया

नवी दिल्ली :- एकेकाळी भारत-ब संघ अडचणीत आला असताना मुशीर खानने एक बाजू लावून धरली होती. यासाठी आवश्यक असलेल्या मजबूत मानसिकतेचे प्रदर्शन त्याने घडविले होते. मुशीरने अशाच प्रकारचे सातत्य राखल्यास, तो भविष्यात भारतासाठी मोठी उपलब्धी असेल, असे मत भारताचा माजी यष्टीरक्षक विजय दहियाने व्यक्त केले.
सध्या सुरु असलेल्या दुलीप करंडक स्पर्धेत भारत-ब संघाच्या मुशीर खानने दमदार १८१ धावांची खेळी करताना सर्वानाच प्रभावित केले होते. भारत-ब संघ अडचणीत आला असताना त्याने नवदीप सैनीच्या साथीने आठव्या गड्यासाठी तब्बल २०५ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारत-ब संघाने पहिल्या डावात ३२१ धावांपर्यंत मजल मारली आहे.
पीटीआयशी साधलेल्या संवादात दहिया पुढे म्हणाला, मुशीरच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे असलेले सातत्य. गेल्या हंगामात देखील त्याने चांगली कामगिरी बजावली होती. या हंगामात देखील त्याने तीच कामगिरी पुन्हा एकदा करून दाखविली आहे. त्याबरोबरीने त्याने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत देखील धावा केल्या होत्या, असे दहियाने पुढे बोलताना सांगितले. मुशीर खानने डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून पदार्पण केले होते. त्याबरोबरीने त्याने फलंदाजीवर देखील लक्ष्य केंद्रित केले होते. त्यामुळेच मुशीरच्या खेळामध्ये मोठे परिवर्तन झाल्याचे दहिया यांनी सांगितले.
सध्या सुरु असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये विजय दहिया पुरानी दिल्ली ६ या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. या स्पर्धेत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्या सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू देखील सहभागी होतात. अशा वरिष्ठ खेळाडूंशी या स्पर्धेच्या माध्यमातून संवाद साधून युवा खेळाडूंना नवीन गोष्टी शिकता येत असल्याचे दहिया म्हटले आहे.
Duleep Trophy 2024 : ऋतुराज ठरला श्रेयसवर भारी; भारत ‘क’ संघाचा ‘ड’ संघावर दणदणीत विजय…
ऋषभ, इशांत शर्मा यांच्याकडून प्रेरणा…
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे ईशान शर्मा व ऋषभ पंत देखील या स्पर्धेचा भाग आहेत. या हंगामात ऋषभ पंतने सर्वच सराव सत्रात सरावाला हजेरी लावली असून इशांत शर्मा एका लढतीत खेळाला आहे. मात्र त्यानंतर इशांतला दुखापत झाल्याने तो पुढील सामने खेळू शकला नाही. असे असले तरी ऋषभ, इशांत यांच्यासारखे खेळाडू येऊन युवा खेळाडूंशी संवाद साधतात. त्यामुळे या नव्या प्रतिभावान खेळाडूंना चांगली प्रेरणा मिळत असल्याचे ही दहिया यांनी सांगितले.





