Womens World Cup 2025 : भारतीय संघाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेत बाहेर

भारतीय संघाला मोठा धक्का –
न्यूझीलंडला पराभूत करत भारताने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. क्षेत्ररक्षण करताना प्रतिका रावल सीमारेषेजवळ घसरली आणि तिच्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. तीव्र वेदनांमुळे तिला तातडीने मैदान सोडावे लागले. सुरुवातीला तिची दुखापत किरकोळ असल्याचा अंदाज होता आणि ती सेमीफायनलपर्यंत बरी होईल, अशी आशा होती. परंतु, स्कॅन अहवालानंतर दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.
A freak injury for Indian opener #PratikaRawal while diving to save a boundary! 😧
Catch the LIVE action ➡ https://t.co/AHK0zZJTc3#CWC25 👉 #INDvBAN | LIVE NOW pic.twitter.com/xvWH7lFTrV
— Star Sports (@StarSportsIndia) October 26, 2025
सेमीफायनल आणि फायनलमध्येही खेळणे कठीण –
संघ व्यवस्थापनाने पुष्टी केली आहे की, प्रतिका रावल 30 ऑक्टोबर रोजी कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल सामन्यात खेळू शकणार नाहीत. तिची दुखापत इतकी गंभीर आहे की, भारताने अंतिम फेरी गाठली तरी तिचा सहभाग जवळपास अशक्य आहे. यामुळे व्यावहारिकदृष्ट्या तिचा विश्वचषक प्रवास येथेच संपुष्टात आला आहे. भारतीय संघासाठी ही बातमी मोठा धक्का आहे, कारण प्रतिका रावलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीची मुख्य आधारस्तंभ म्हणून भूमिका बजावली होती.
हेही वाचा – IND vs SA : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, कर्णधार टेम्बा बावुमाचे पुनरागमन
प्रतिका रावलची प्रभावी कामगिरी –
अवघ्या एका वर्षात प्रतिका रावलने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने आपल्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. ती वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारी भारतीय खेळाडू ठरली. शिवाय, एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण करण्याच्या ती जवळ होती.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : पृथ्वी शॉचा रणजीत मोठा धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकलं विक्रमी द्विशतक
संघापुढे मोठी आव्हाने –
प्रतिका रावलच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघासमोर मोठे आव्हान आहे. तरीही कर्णधार हरमनप्रीत कौर आणि व्यवस्थापनाला विश्वास आहे की, इतर खेळाडू ही कमतरता भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. आता सर्वांचे लक्ष 30 ऑक्टोबर रोजी कॅनबेरामध्ये होणाऱ्या सेमीफायनल सामन्याकडे लागले आहे, जिथे भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होईल. या धक्क्यातून सावरत भारतीय संघ किती मजबुतीने विश्वचषकाच्या जेतेपदासाठी आपली दावेदारी सिद्ध करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





