Yuvraj Singh : ‘यशाची गुरुकिल्ली म्हणजे संघाने आपल्या…’, महिला विश्वचषकापूर्वी युवीने भारतीय संघाला दिला खास सल्ला

Yuvraj Singh advice to India’s Women Team : आयसीसी एकदिवसी विश्वचषच 2011चा ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या विश्वचषकासाठी ’50 डेज टू गो’ या आयसीसीच्या कार्यक्रमात युवराज यांनी आपले विचार मांडले.
घरच्या मैदानावर विश्वचषक खेळण्याचे स्वतःचे फायदे –
मुंबईत आयोजित या कार्यक्रमात युवराजने घरच्या मैदानावर विश्वचषक खेळण्याचा आपला अनुभव सांगितला. युवराज सिंग म्हणाला, “घरच्या मैदानावर विश्वचषक खेळण्याचे स्वतःचे फायदे आहेत. भारतीय महिला संघाने याचा पुरेपूर लाभ घ्यावा. आतापर्यंत सर्वांनी पुरुष संघाला पाठिंबा दिला, आता महिलांना विश्वचषक जिंकण्यासाठी प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे.”
50 षटकांचा विश्वचषक हाच खरा विश्वचषक –
युवराज पुढे म्हणाला, “50 षटकांचा विश्वचषक हाच खरा विश्वचषक आहे. भारतात याचे आयोजन होत आहे, याचा सर्वांनी उत्साहाने स्वीकार करावा. असे क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत. यशाची गुरुकिल्ली म्हणजे संघाने आपल्या प्रक्रियांवर ठाम राहणे. तसेच ही इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. पण याचा अर्थ असा नाही की सुरुवातीपासूनच तुम्ही जिंकणार आहात असा विचार करावा. संपूर्ण प्रक्रियेचा अनुभव घ्यावा लागेल. ही प्रक्रिया अनुभवताना परिणाम नक्कीच मिळतील,” असे त्यानी नमूद केले.
हेही वाचा – Glenn Maxwell : मॅक्सवेलने घेतला सूर्यासारखा थक्क करणारा झेल, हवेत उडी अन् विजयाचा थरार! पाहा VIDEO
भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगा –
युवराजने भारतीय महिला संघाला प्रेरणा देताना सांगितले, “हा संघ काही अंतिम सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. आम्हीही असा काळ अनुभवला आहे. या क्षणांचा आनंद घेणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगा. आम्ही पुरुष संघाला पाठिंबा दिला, आता महिलांना पाठिंबा देण्याची वेळ आहे.” 2025 चा महिला विश्वचषक हा भारतासाठी एक मोठी संधी आहे आणि युवराज यांच्या या सल्ल्याने भारतीय महिला संघाला नक्कीच प्रेरणा मिळेल.





