MUM vs HYD Ranji Trophy Result : रणजी ट्रॉफी २०२६ मधील आपल्या जबरदस्त फॉर्मला कायम राखत मुंबईने हैदराबादचा त्यांच्याच घरी ९ गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला, तर गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर ढकलले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. सर्फराझ खानचे तुफानी द्विशतक – मुंबईच्या विजयाचा पाया सर्फराझ खानने रचला. पहिल्या डावात सर्फराझने अवघ्या २१९ चेंडूत २२७ धावांची मॅरेथॉन खेळी केली. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार ठोकले. सर्फराझच्या या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ५६० धावांचा डोंगर उभा केला. या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मुशीर खानची फिरकीची जादू – फलंदाजीनंतर गोलंदाजीत सर्फराझचा धाकटा भाऊ मुशीर खान चमकला. हैदराबादने पहिल्या डावात २६७ धावा केल्या, ज्यानंतर मुंबईने त्यांना ‘फॉलोऑन’ दिला. दुसऱ्या डावात मुशीरने भेदक मारा करत ७९ धावांत ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मुशीर खानने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईने खान बंधूच्या जोरावर हैदराबादवर केली मात हैदराबादचा प्रतिकार पडला अपुरा – दुसऱ्या डावात हैदराबादची स्थिती १६६ धावांवर ७ बाद अशी नाजूक होती. मात्र, आठव्या क्रमांकावर आलेल्या चामा मिलिंदने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्यानंतर नितीन साई यादव (३२) आणि कर्णधार मोहम्मद सिराजने (३२) फटकेबाजी करत संघाला ३०२ धावांपर्यंत नेले. तरीही मुंबईला विजयासाठी चौथ्या डावात केवळ १० धावांचे छोटे लक्ष्य मिळाले. जे मुंबई संघाने १ गडी गमावून ३.२ षटकात पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केला. हेही वाचा – Harbhajan Singh Criticized : ‘दोन विरुद्ध एकचा गेम फसला!’ बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर भज्जीने पाकिस्तानचा खरा चेहरा केला उघड मुंबईने गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान – मुंबईने अखिल हेरवाडकरची विकेट गमावून हे लक्ष्य सहज पार केले. ६ सामन्यांमधील मुंबईचा हा चौथा विजय आहे. रणजी ट्रॉफीच्या ‘एलिट ग्रुप डी’ मध्ये मुंबईचा संघ ३० गुणांसह सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.