प्रभात वृत्तसेवा पुणे – तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी झालेला आहात. त्यामुळे तुमच्यांकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कुठे चौफुल्यावर जाऊन तडफडू नका, ढगात ठाँय – ठाँय गोळ्या मारू नका, अशा प्रकारांमुळे तुमची अन् पक्षाचीसुद्धा बदनामी होईल, असे सांगत पवार यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुळशी येथील सभागृहात मुळशी, भोर आणि राजगड तालुक्यांतील विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार शंकर मांडेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.अशा प्रकारांमध्ये आमचा काय दोष असतो. आम्ही सांगतो का, गोळ्या घाला म्हणून, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. कोणी सरपंच लग्नाला बोलवतो, म्हणून आम्ही तिथे जातो. मात्र, पुढे हा काय दिवे लावणार आहे, हे आम्हाला माहिती असते का, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालणारा, सर्वसमावेशक हिताचे भान जपणारा पक्ष आहे. आम्ही काम करताना कोणताही जात- पंथ- धर्माचा भेदभाव करत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका जोपासायची आहे, असे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.