Divya Deshmukh : १९ वर्षीय दिव्याने रचला इतिहास: फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय ठरल्यानंतर भावुक

Divya Deshmukh FIDE Womens Chess World Cup 2025 : १९ वर्षीय दिव्या देशमुखने ३८ वर्षीय कोनेरू हम्पीचा अंतिम सामन्यात पराभव करून फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन भारतीय खेळाडू अंतिम सामन्यात आमनेसामने आल्या. जॉर्जियाच्या बातुमी येथे सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यातील पहिले दोन डाव बरोबरीत सुटले, त्यानंतर टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला. टायब्रेकरमध्ये काळ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याने हम्पीचा पराभव केला आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले.
विजयानंतर दिव्या भावुक –
तीन दिवस चाललेल्या क्लासिकल बुद्धिबळाच्या थरारक सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले. पहिल्या रॅपिड टायब्रेकरमध्येही दोघींनी बरोबरी साधली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये दिव्याने २.५-१.५ असा विजय मिळवला विजय मिळवला. विजयानंतर दिव्या भावुक झाली आणि तिथे उपस्थित असलेल्या तिच्या आईला मिठी मारून ढसाढसा रडली. दिव्या आणि हम्पी यांच्यातील अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. पहिल्या दोन डावांमध्ये दिव्याने हम्पीला कोणतीही संधी न देता बरोबरी साधली.
Divya’s hug to her mom says everything ❤️#FIDEWorldCup @DivyaDeshmukh05 pic.twitter.com/jeOa6CjNc1
— International Chess Federation (@FIDE_chess) July 28, 2025
त्यामुळे सामना टायब्रेकरपर्यंत गेला. सोमवारी पहिला टायब्रेकरही बरोबरीत सुटला, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये हंपीने एक चूक केली आणि दिव्याला दबाव टाकण्याची संधी मिळाली. शेवटच्या काही सेकंदांमध्ये हम्पीने हार मानली आणि दिव्याने विजय मिळवला. विजयानंतर दिव्या तिथेच खुर्चीवर बसून रडू लागली, तिला विश्वासच बसत नव्हता. या विजयासह दिव्याने ग्रँडमास्टर ही पदवी मिळवली. यापूर्वी ती इंटरनॅशनल मास्टर होती. तसेच, तिने पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली. या स्पर्धेचा विजेता विश्वचॅम्पियनला आव्हान देण्याची संधी मिळवतो.
हेही वाचा – IND vs ENG : जडेजा-सुंदरच्या शतकांमुळे स्टोक्स अस्वस्थ, हस्तांदोलन करताना गिलकडे केले दुर्लक्ष
जेव्हा शेवटचे काही सेकंद बाकी होते, तेव्हा भारताचे महान बुद्धिबळ खेळाडू आणि माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांनी लाइव्ह सामना पाहताना सांगितले की, हम्पीने मोठी चूक केली आहे. यामुळे दिव्याला आघाडी मिळाली आणि १९ वर्षीय या खेळाडूने याचा पुरेपूर फायदा घेतला. विजयानंतर दिव्याला तिच्या कुटुंबीयांनी गराडा घातला आणि सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. दिव्याने दाखवून दिले आहे की, ती येणाऱ्या काळातील तारा आहे आणि बुद्धिबळात भारताचे भविष्य उज्ज्वल आहे.
मला अजूनही या विजयावर विश्वास बसत नाहीये –
𝐃𝐢𝐯𝐲𝐚 𝐃𝐞𝐬𝐡𝐦𝐮𝐤𝐡 𝐝𝐞𝐟𝐞𝐚𝐭𝐬 𝐇𝐮𝐦𝐩𝐲 𝐊𝐨𝐧𝐞𝐫𝐮 𝐭𝐨 𝐰𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝟐𝟎𝟐𝟓 𝐅𝐈𝐃𝐄 𝐖𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐮𝐩 🏆.#FIDEWorldCup | #DivyaDeshmukh | #HumpyKoneru pic.twitter.com/CubWCPTlLX
— All India Radio News (@airnewsalerts) July 28, 2025
सामन्यानंतर दिव्या म्हणाली, “मला अजूनही या विजयावर विश्वास बसत नाहीये. याचा स्वीकार करण्यासाठी मला थोडा वेळ लागेल. मला वाटतं, हा विजय मला नशिबानेच मिळाला आणि त्यामुळे मला ग्रँडमास्टर हा किताब मिळाला. या स्पर्धेपूर्वी माझ्याकडे नियमांचे पुस्तकसुद्धा नव्हते. हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढे अजून बरंच काही साध्य करायचं आहे. मला आशा आहे, की ही फक्त सुरुवात आहे.”





