Dilip Mohite Patil: ‘आजच्या आज रस्ता सुरू करा!’ दिलीप मोहिते पाटलांच्या इशाऱ्यानंतर चासकमान कालव्याचा पूल खुला
Dilip Mohite Patil: राजगुरुनगर-तिन्हेवाडी मार्गावरील कालव्याचा पूल बंद केल्याने नागरिकांचे हाल; दिलीप मोहिते पाटील यांनी प्रशासनाला सुनावत रस्ता केला खुला.

Dilip Mohite Patil – आजच्या आज रस्ता सुरू करा! असा स्पष्ट आदेश माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चासकमान प्रकल्पाच्या अधिकार्यांना दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर राजगुरुनगर-तिन्हेवाडी मार्गावरील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल गुरुवारी नागरिकांच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गैरसोयीचा सामना करणार्या तिन्हेवाडी परिसरातील नागरिकांसह क्रीडाप्रेमी,
विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. राजगुरुनगर-तिन्हेवाडी हा हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलाकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. कालव्यावरील पुलाचा मध्यवर्ती खांब धोकादायक झाल्याचे कारण देत चासकमान प्रकल्प प्रशासनाने बुधवारी दुपारपासून हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील व्यायाम, भरतीपूर्व सराव आणि विविध क्रीडा प्रकारांसाठी येणार्या युवक-युवतींसह चालण्यासाठी येणार्या ज्येष्ठ नागरिकांना तब्बल दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता.
तसेच पाचारणेवाडी, आरुडेवाडी, सांडभोरवाडी तसेच सातकरस्थळ (पूर्व) आणि कोहिनकरवाडी या गावांतील नागरिकांच्याही दैनंदिन प्रवासावर त्याचा परिणाम झाला होता. चासकमान प्रकल्पाच्या शाखा अभियंत्यांनी पुलाच्या मध्यवर्ती खांबाला धोका निर्माण झाल्याने आणि कालव्यात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगितले होते.
मात्र हा खांब गेल्या दहा वर्षांपासून याच स्थितीत असून, तो प्रत्यक्षात खचलेला किंवा झुकलेला नसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेच्या बाजूने काही दगड निखळले असले तरी वेळेत दुरुस्ती न करता ऐन पावसाळ्यात अचानक रस्ता बंद करण्याच्या निर्णयावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिष्टमंडळाने मांडली नागरिकांची व्यथा
तिन्हेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाचारणे, सरपंच प्रतीक्षा पाचारणे, उपसरपंच रंगनाथ आरुडे, विठ्ठल वरकड, प्रियांका पाचारणे, ज्योती सांडभोर, निलेश पठारे, संतोष पाचारणे, शेखर पाचारणे, अशोक आरुडे आणि प्रशांत पाचारणे आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेऊन नागरिकांची अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
दूरध्वनीवरून दिले तातडीचे निर्देश
यावेळी मोहिते पाटील यांनी चासकमान प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. जड वाहतुकीवर निर्बंध कायम ठेवत हलक्या वाहनांसाठी रस्ता तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर काही वेळातच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर टाकलेला मुरूम व मातीचा ढिगारा हटविण्यात आला आणि पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.






