Chas Kaman Dam: चासकमान धरणाचे ५ दरवाजे उघडले! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Chas Kaman Dam: भीमा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ; नदीपात्रात न उतरण्याचे आणि शेतीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे धरण प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.

Chas Kaman Dam – खेड तालुक्यात संततधार पावसामुळे चास कमान धरण 98 टक्के भरले असून बुधवारी सकाळपासून धरणाच्या पाचही दरवाजांतून भीमा नदीपात्रात 7,500 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून धरणाखालच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 3 ते 8 जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील चास कमान,
भामा आसखेड आणि कळमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चास कमान धरणाची पातळी 98 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात सुमारे 8 ते 9 हजार क्यूसेस वेगाने पाण्याची आवक होत असल्याने साठा नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चास कमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. टी. जाधवर यांनी सांगितले की, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील साठा नियंत्रित ठेवण्यासाठी सांडव्यातून 7,500 क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावरील शेती अवजारे, पाणी उपसा पंप व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.





