मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असणारे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका होत आहे.
आता, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. कोर्ट कचेरीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केले. भुजबळ यांनी म्हटले की, शरद पवार यांनी राज्यात मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी देखील भाजपने याला विरोध केला होता. आतादेखील भाजपकडून याला विरोध करण्याचे काम केले जात असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.
भाजपच्या कृतीत आणि विचारात फरक असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले. आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. माझी जनतेला विनंती आहे ज्यानी आरक्षणाला विरोध केला त्यांना दारात उभं करू नका. कोर्ट कचेरीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरुन सध्या वातावरण तापले असताना आता राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.