Dhurandhar : “धुरंधर सिनेमा एक भयानक ‘कुत्रा’, तो प्रत्येक बड्या…”; राम गोपाल वर्मांनी लगावला सणसणीत टोला

Ram Gopal Varma | Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानातील गँगस्टर आणि भारतीय गुप्तहेराच्या संघर्षाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन अशा तगड्या स्टारकास्टने सजलेल्या या सिनेमाचे कौतुक होत असतानाच, बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक खळबळजनक पोस्ट लिहून बॉलिवूडच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ‘X’ (ट्विटर) वर ‘धुरंधर’चे कौतुक करताना इंडस्ट्रीतील लोकांच्या असुरक्षिततेवर बोट ठेवले. ते म्हणतात, “जेव्हा ‘धुरंधर’सारखा एखादा क्रांतिकारी चित्रपट सुपरहिट होतो, तेव्हा इंडस्ट्रीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण त्या दर्जापर्यंत पोहोचू शकत नाही, याची भीती त्यांना सतावत असते. हे लोक या सिनेमाला एका वाईट स्वप्नासारखं समजतात, जे झोपेतून उठल्यावर नाहीसं होईल असं त्यांना वाटतं.”
Whenever a path breaking and monstrous hit like #dhurandhar comes , the industry people will wish to ignore it because they will feel threatened by it due to their inability to match it’s standards ..So they will think of it as a nightmare, which will vanish when they wake up in…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 25, 2025
मोठ्या बजेटच्या सिनेमांना ‘त्या’ कुत्र्याची उपमा!
वर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये एक रंजक उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, “समजा तुम्ही कुणाच्या घरी गेलात आणि तिथे एक मोठा, भयानक कुत्रा तुमच्याकडे टक लावून पाहत आहे. मालक कितीही म्हणाला की तो काही करणार नाही, तरी तुमचा ताण कमी होत नाही. ‘धुरंधर‘ हा सिनेमादेखील असाच एक भयानक कुत्रा ठरेल, जो इथल्या प्रत्येक बिग बजेट सिनेमाच्या कार्यालयात अदृश्यपणे फिरत राहील. निर्माते त्याचं नाव घेणं टाळतील, पण तो त्यांच्या मनात कायम घुटमळत राहील.”
राम गोपाल वर्मा यांच्या मते, ज्या निर्मात्यांचा विश्वास फक्त VFX, महागडे सेट्स, आयटम साँग्स आणि ठोकळेबाज हिरोगिरीवर होता, त्यांच्यासाठी ‘धुरंधर’ हा एखाद्या ‘हॉरर सिनेमा’पेक्षा कमी नाही. या सिनेमात कलाकारांच्या प्रतिमेपेक्षा सिनेमाच्या आशयाला महत्त्व दिले गेले आहे. आदित्य धरने बॉलिवूडला आरसा दाखवला असून त्यांचे स्वतःचे चित्रपट किती पोकळ आहेत, याची जाणीव करून दिली आहे.





