Daund Crime: दौंडमध्ये भयंकर घटना! बंद घर पाहून साधला डाव; सकाळी दरवाजा उघडताच बसला मोठा धक्का
Daund Crime: दौंड शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी.

Daund Crime – शहरातील पद्मावती नगर परिसरातील दोन बंद सदनिका फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ९ लाख ३१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ५४ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली आहे. या प्रकरणी नितीन बाळासाहेब नवले (रा. नेत्रम अपार्टमेंट, पद्मावती नगर, दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी फिर्यादी नितीन नवले हे कुटुंबीयांसह समता नगर येथील भावाच्या घरी एका कौटुंबिक कामासाठी गेले होते. रात्री त्यांचा मुक्काम तिथेच होता. दुसऱ्या दिवशी (दि. ९) सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीला अपार्टमेंटमधील शेजारी जगदाळे यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावलेली दिसत असल्याचे सांगितले.
त्यामुळे नवले यांनी जगदाळे यांना आत जाऊन पाहणी करण्यास सांगितले. जगदाळे यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती नवले यांच्या पत्नीला दिली. फिर्यादी कुटुंबीयांसह तत्काळ घरी पोहोचले असता, बेडरूममधील कपाटाचे लॉकर तुटलेले दिसले. कपाटातील ७ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब झाल्याने चोरी झाल्याची त्यांची खात्री पटली.
दरम्यान, याच कालावधीत फिर्यादींच्या ओळखीचे अमित ईश्वरलाल चंडालिया (रा. स्वप्नसागर अपार्टमेंट, दौंड) यांच्याही घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली. चोरट्यांनी चंडालिया यांच्या घरातून १ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड पळवली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करत आहेत.





