Shirur : बदली झालेल्या ‘त्या’ पोलिसांना कार्यमुक्तीचे आदेश
Shirur : पुणे ग्रामीण पोलिस दलातील बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिले.

Shirur : पुणे ग्रामीण पोलिस दलातील बदलीचे आदेश होऊनही काही अधिकारी व कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे वृत्त ‘दैनिक प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी वायरलेसवरून दिले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस दलातील नियतकालिक बदल्यांचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले होते. मात्र, आदेश होऊनही काही अधिकारी-कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याने बदलीच्या आदेशांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत ‘बदलीचे आदेश कागदावरच; पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कार्यमुक्त कधी करणार?’ या मथळ्याखाली ‘प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. पोलिस अधीक्षक गिल्ल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत बदली झालेल्यांना जुन्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बदलीनंतर वेळेत कार्यमुक्ती न झाल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र होते. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बदली प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी वेळेत रुजू होतात का, याकडे लक्ष लागले आहे.





