Indapur Crime: शेतीसाहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड! वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई
Indapur Crime: गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांचे जाळे; भवानीनगर परिसरातून तीन संशयितांना घेतले ताब्यात.

Indapur Crime – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून सौर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप आणि केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत शेती साहित्य व वाहनांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी पिकअप आणि सौर मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
जयदीप नानासो घोळवे (वय २२), मेघराज नानासो ओंबासे (वय २२) आणि आकाश विलास शिंदे (वय २३, सर्व रा. निंबोडी, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या सूचनेनुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तपास पथकाला तपासाचे आदेश दिले होते.
तपासादरम्यान पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड व अमंलदार गणेश वानकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, लाकडी, शिंदेवाडी व भवानीनगर परिसरात ट्रॉली चोरीच्या घटनांमध्ये जयदीप घोळवे व त्याचे साथीदार सहभागी आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित भवानीनगर परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप व सौर मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, चारचाकी ट्रॉली, महिंद्रा पिकअप, सौरपंप आणि चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





