निघोज – मुलिका देवी विद्यालय ते एसटी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
कुकडी कॉलनी शेजारील घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने बहुसंख्य घरकुलात पाणी जाऊन किराणा तसेच धान्य पूर्णपणे खराब झाले. घरकुलामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला असून एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी दत्तात्रय काळे व सुनील उचाळे यांनी घरकुलांची पाहणी करीत पंचनामे केले.
तहसीलदार यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. कुकडी कॉलनी शेजारील घरकुलात पाणी शिरल्याने या घरकुलात राहणाऱ्या गरीब लोकांना फार मोठा आर्थिक फटका बसला असून, किराणा, धान्य व चीजवस्तू यांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने या लोकांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.