Cyber Fraud : सायबर चोरट्यांचा धक्कादायक कारनामा ; व्यावसायिकाची सव्वा कोटींची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पाषाण भागातील एका व्यवासायिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यावसायिक पाषाण भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी मे महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवला.
शेअर बाजारातील गुंतवणूकविषयक संस्थेतील प्रतिनिधी असल्याचे सांगून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परताव्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. व्यावसायिकाने सुरुवातीला चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. त्यानंतर त्यांना परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली नव्हती. व्यावसायिकाने सायबर चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा केले. मात्र, चोरट्यांनी परतावा दिला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.





