Financial Fraud – गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १५ मे २०२३ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत मुळशी तालुक्यातील माण येथील शुभारंभ रेसिडेन्सी येथे घडला. याबाबत एका नागरिकाने शनिवारी (दि. ७ मार्च) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश पुंजाजी आहेरकर, महिला आरोपी, वेदांत रमेश आहेरकर आणि आदित्य रमेश आहेरकर (सर्व रा. शुभारंभ रेसिडेन्सी, दत्त मंदिराजवळ, माण, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२३ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांना शेअर मार्केट तसेच भिशीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. दरमहा ४ ते ५ टक्के जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादींचे ५७ लाख ६ हजार रुपये आणि इतर गुंतवणूकदारांचे ३ कोटी ५९ लाख १४ हजार ८९२ रुपये असे एकूण ४ कोटी १६ लाख २० हजार ८९२ रुपये जमा केले. कोणतीही रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.